‘एग्जिट पोल’ म्हणजे निकालापूर्वीचे मनोरंजन !

0
8

राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि तासाभरात राज्यातील समस्त वृत्तवाहिन्यांनी  एग्जिट पोलचा निकष दाखवण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांपासून निवडणुकानंतर एक्सिट पोलचे निकाल दाखवण्याची प्रथा भारतात जोर धरू लागली आहे. कोणत्यातरी संस्थांच्या मार्फत हे  एग्जिट  पोल आखले जातात आणि वृत्तवाहिन्यांशी संगनमत करून ते लोकांसमोर ठेवले जातात. हें  एग्जिट पोल वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर दाखवताना स्टुडिओमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींना, राजकीय विश्लेषकांना निमंत्रित केले जाते.  एग्जिट पोलने दाखवलेल्या आकडेवारीच्या अनुषंगाने एखाद्या क्षेत्रातील पक्षाची घसरण अथवा प्रगतीच्या अनुरूप पक्षाच्या प्रतिनिधिला प्रश्न विचारले जातात आणि त्यातून आम्ही दाखवलेला एग्जिट पोल कसा खरा आहे हे त्यांच्याकडून वदवण्याचा प्रयत्न केला जातो: मात्र या प्रयत्नांना यश कधीच येत नाही.

प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीची उत्तरे  ठराविक आणि एकसारखीच असतात ती म्हणजे ‘खरे काय ते निकालाच्या दिवशीच कळेल’ ‘राज्याच्या विकासासाठी यावेळेस जनतेने आम्हालाच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे’ ‘आम्हालाच स्पष्ट बहुमत मिळून राज्यात आमचेच सरकार बनेल’. मुलाखतकाराने कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी या मंडळींच्या उत्तरांमध्ये मात्र फारसा फरक पडत नाही. वृत्तवाहिन्यांवरील एकूणच माहोल पाहता  एग्जिट  पोलचा दिवस म्हणजे वृत्तनिवेदकांची, संपादकांची आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जणू रंगीत तालीम असते.

लाखो रुपये व्यय करून मांडण्यात येणारे हें  एग्जिट पोल वेगवेगळ्या वाहिन्यांवर थोड्याबहुत फरकाने वेगवेगळे असतील याची विशेष दक्षता घेतली जाते. यापूर्वीच्या निवडणुकापूर्वी मांडण्यात आलेले  एग्जिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्षात निवडणुकांतील आकडेवारी यामध्ये मोठी तफावत येत असल्याचे लक्षात आले आहे त्यामुळे यंदासुद्धा  एग्जिट पोल्सने मांडलेल्या निकालाच्या अंदाजांना निकालापूर्वीच्या मनोरंजनाव्यतिरिक्त फारशी किंमत आहे असे वाटत नाही.

सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 

ReplyForwardYou received this via BCC, so you can’t react with an emoji
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here