ग्रामीण भागातही ऑनलाईन क्यूआर कोडची चलती

0
जत : वाढत्या आधुनिकीकरणाने शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक हायटेक बदल व्हायला सुरुवात झाली आहे. यात शासकीय योजनांचा लाभ असो वा शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी. आता सगळीकडेच कॅशलेस व्यवहारांना अधिक पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ऑनलाईन क्यूआर कोडची चलती आहे.पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन व्यवहारांवर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी साहित्यापासून अगदी दहा-वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण ४० टक्के असून, आता खिशात नव्हे तर बँक खात्यात पैसा असायला हवा अशी व्यवस्था निर्माण झाली आहे.

 

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यामुळे ग्राहक क्यूआर कोडची मागणी करतात. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करायचे असते. त्यामुळे लहान-मोठ्या सर्वच व्यावसायिकांनी तशी सोय उपलब्ध केली आहे.
-दादासाहेब चव्हाण, फळ व्यावसायिक
Rate Card
बाजारात इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध तर झालीच, शिवाय मोबाईल इंटरनेटचा डेटाही उपलब्ध असतो.शिवाय इंटरनेटचा वेगही अधिक असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया ग्रामीण भागातही चांगला स्थिरावला आहे. अगदी दूधवाला, भाजीवाल्याकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला, त्याचबरोबर त्यातील ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले. सर्वच व्यवहार मोबाईलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. म्हणजेच बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापर्यंत ऑनलाईन चोरट्यांची मजल गेली आहे. अशा पद्धतीने आपण लुबाडले जाऊ नये याची दक्षता सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.