निवडणुकीचा तिसरा टप्पाही पार पडला. चौथा टप्पा १३ मेला पार पडल्यानंतर पाचव्या टप्यात २० मेला राज्यातील मुंबई-ठाणे या प्रमुख शहरांसह कल्याण, भिवंडी. पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या ठिकाणच्या निवडणूकाही पार पडणार आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्या पडल्याने शहरांतील अनेक जण सहकुटुंब आपल्या गावी केले आहेत. ‘माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे’ या विचाराने ही मंडळी केवळ मतदान करण्यासाठी शहरात परततील असे खचितच घडू शकते. दोन्ही जिल्ह्यांतून गावी गेलेल्यांची एकूण संख्या पाहता ती लाखांच्या घरात असल्याने या संख्येमुळे मतदानाच्या टक्केवारीवर निश्चितच फरक पडणार आहे. या मंडळींना मतदानाचे महत्व लक्षात आणून देण्याचे कार्य शेजारी पाजारी राहणाऱ्या मंडळींना आणि ज्या गावी ही मंडळी गेली आहेत तेथील ग्रामस्थांना करावे लागणार आहे.
मतदानाचे महत्व लक्षात घेऊन आपण मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणारच आहोत त्याचसोबत मतदानापासून वंचित राहू पाहणाऱ्यांना मतदानास प्रवृत्त करण्याचे कामही आपले कर्तव्यच आहे असे समजून गावी गेलेल्या आपल्या शेजाऱ्यांना संपर्क करून त्यांना मतदान करण्यासाठी बोलवूया. ज्या गावी ही मंडळी गेली आहेत तेथे शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांसह स्थानिक ग्रामपंचायतीतील प्रमुख मंडळींनी शहरातून सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या मुंबई-ठाणेकरांना मतदान करण्यासाठी आपापल्या शहरांत जाण्यासाठी आग्रह करूया. लोकप्रतिनिधींच्या कामाबद्दल आपला रोष आपण वर्षभर प्रकट करतच असतो मात्र त्यांना अद्दल घडवण्याची आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी आपल्याला पाच वर्षांतून एकदा मिळते ती दवडता कामा नये.
गेल्या काही वर्षांत या दोन्ही शहरांतील अनेक मंडळी आपली शहरातील घरे विकून अथवा भाड्याने देऊन अंबरनाथ, बदलापूर, वांगणी यांसारख्या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत; मात्र त्यांचे नाव अद्यापही शहरातील त्यांच्या घरांच्या पत्यावरील मतदार याद्यांमध्ये आहे अशा मंडळींना मतदानासाठी वेळ काढून बोलावण्याचे कामही शेजारी राहणाऱ्या मंडळींनी करावे. शहराबाहेर गेलेली ही सर्वच मंडळी मतदानासाठी एव्हढ्या लांबून येतील असेही नाही; मात्र यातील काहीजण तरी आपण केलेल्या आग्रहामुळे लाजेखातर का होईना शहरात मतदान करण्यासाठी नक्कीच येतील. याचसोबत आपल्या शेजारी राहणाऱ्या मंडळींपैकी कोणी मतदानाच्या दिवशी सहलीचे नियोजन करत असेल, तर अशांचेही प्रबोधन करून त्यांचे नियोजन हाणून पाडण्याचे दायित्व आपण घेऊया. प्रमुख शहरांतील निवडणूका अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात बऱ्याचदा येथील निकालांवर राज्यातील पर्यायाने देशातील जनमताचा कौल लक्षात घेतला जातो त्यामुळे या ठिकाणची टक्केवारी वाढवणे राजकीय पक्षांसाठी जिकरीचे असते. शिवाय शहरातील मतदान केंद्रे ही बऱ्याचदा घरापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरातच असतात त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदान अधिक होणे अपेक्षित असते; मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही.
‘माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे’ ही मानसिकता लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. २००४ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवार ए. आर. कृष्णमूर्ती यांना ४०७५१ मते पडली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ४०७५२ मते पडली, परिणामी ए. आर. कृष्णमूर्ती यांचा केवळ एका मताने पराभव झाला. २००९ च्या राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले सी.पी. जोशी यांना ६२२१५ मते पडली, तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या कल्याण सिंह चौहान यांना ६२२१६ मते पडली. अटीतटीच्या या लढतीमुळे सी.पी. जोशी यांना आमदारकीसह मुख्यमंत्री पदावरही पाणी सोडावे लागले. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांनी विद्यमान सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. वाजपेयी या ठरावाला हिमतीने सामोरे गेले. या ठरावावर झालेल्या मतदानात अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाजूने २६९ मते पडली, तर विरोधात २७० मते पडली. केवळ एका मताच्या फरकामुळे वाजपेयी सरकार १३ दिवसांतच कोसळले. एका मताचे महत्व सांगणारी अशी अनेक उदाहरणे जगाच्या राजकारणात होऊन गेली आहेत त्यामुळे एक मताने काय फरक पडणार आहे असे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. लोकांच्या मनात लोकशाही किती रुजली आहे हे निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून येते. विश्वातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून बिरुद मिरवणाऱ्या भारतातील मतदारांची मतदानाविषयीची नाराजी निंदनीय आहे, ही टक्केवारी वाढवण्यासाठी आज सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०