तासगाव :पुनदी योजनेचे सावळज भागाला सोडलेले पाणी एका नेत्याच्या सांगण्यावरून बंद केले, असा आरोप करीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर सुमारे दोन तास रस्ता रोको केला. दरम्यान, योजनेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थातुरमातुर उत्तरे दिल्याने शेतकरी आक्रमक झाले. दोन तास रास्ता रोको केल्यानंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले.
सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी द्राक्ष शेतीसह अन्य पिके अडचणीत आली आहेत. अनेक गावात पिण्यासाठीही पाणी नाही. पाटबंधारे विभागाला सावळज भागात पाणी सोडावे, अशी अनेक निवेदने दिली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकाही घेतल्या आहेत. या भागातील पाणीटंचाई अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे.
त्यानंतर शनिवारी पुनदी योजनेचे पाणी सावळज भागाला सोडण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासात हे पाणी बंद झाले. त्यामुळे सावळज, सिद्धेवाडी या भागातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले. एका नेत्याच्या सांगण्यावरून हे पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जर पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी नाचत असतील तर ते अजिबात सहन केले जाणार नाही, असेही शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे.
दरम्यान, पुनदी योजनेचे पाणी अवघ्या काही तासात बंद केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तासगाव – भिवघाट महामार्गावर बिरणवाडी नजीक रास्ता रोको केला. सकाळी सव्वा दहा वाजता सुरू झालेला रास्ता रोको साडेबारा वाजेपर्यंत सुरू होता. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना या रास्ता रोको बाबत कल्पना दिली. मात्र पाटबंधारे विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी आला नाही. पाणी सोडणाऱ्या व कनिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी पाठवून शेतकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केला.
मात्र, शेतकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी आंदोलन स्थळी आलेल्या पाटबंधारीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थातूरमातूर उत्तरे दिली. काहीतरी लिहून देऊन आंदोलन संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी आले पाहिजे, ही मागणी लावून धरली.
दरम्यान बंदोबस्तासाठी आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना बराच काळ विनंती केली. ‘महामार्ग अडवू नका. प्रवाशांची गैरसोय होत आहे. कायदा हातात घेऊ नका. तुमची जी मागणी आहे त्याबाबत पाटबंधारे कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करा. मात्र सामान्य जनतेला वेठीस धरू नका,’ अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. मात्र आंदोलन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
त्यानंतर आंदोलन स्थळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे दाखल झाले. त्यांनीही आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘तुमच्या मागण्यांसाठी सामान्य लोकांना वेठीस धरू नका, अशी विनंती केली. मात्र आंदोलन कोणाचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना उचलून पोलीस गाडीत टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची व झटापट झाली.
आंदोलनात बी. टी. पाटील, ताजुद्दीन तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, पै. राजू चव्हाण, प्रकाश पाटील, शिदगोंड पाटील, रमेश कांबळे, राजू सावंत, दीपक ऊनउने, रवींद्र शिंदे, संदीप पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
*आम्ही चालत पोलीस ठाण्याकडे येतो : आंदोलकांचा आक्रमक पवित्रा…!*
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार वादावादी झाली. आंदोलकांनी सर्वांवरच गुन्हे दाखल करा. सर्वांना अटक करा, अशी भूमिका घेतली. तर पोलिसांनी आंदोलकांना पोलीस गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी ‘आम्ही आरोपी नाही. पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे. आम्ही कोणताही कायदा हातात घेतला नाही. आम्ही फार मोठा गुन्हा केला नाही. त्यामुळे आम्ही पोलीस गाडीत बसणार नाही. आमच्यावर कारवाईच करायची असेल तर आम्ही चालत तासगाव पोलीस स्टेशनला येतो,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र अखेर पोलिसांनी आंदोलकांना पोलीस गाडीत घालून तासगावला आणले.
*मटका, जुगारावर कारवाई करा : बी. टी. पाटील*
पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या बी. टी. पाटील यांनी ‘आम्ही शेतकरी आहोत. गुन्हेगार नाही. पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे. मात्र तुम्ही आम्हाला कायद्याची भाषा सांगत असाल तर तालुक्यात सुरू असणारा मटका जुगार व अन्य काळे धंदे अगोदर बंद करा. मग शेतकऱ्यांवर खुशाल कारवाई करा, असे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना सुनावले.
*पाच मिनिटांत हलायचे नाही तर सर्वाना ताब्यात घेईन : पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकांना दमबाजी*
आंदोलनस्थळी अनेकांना ताब्यात घेतल्यानंतर बरेचसे शेतकरी रस्त्याच्या आजूबाजूला उभे होते. यावेळी संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने या शेतकऱ्यांना उद्देशून ‘पाच मिनिटात इथून हलायचे. नाहीतर सर्वांना ताब्यात घेईन, अशी दमबाजी केली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त पडसाद उमटले.
*आंदोलकांवर गुन्हे दाखल…!*
पाण्यासाठी बेकायदेशीररित्या रस्ता अडवला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. रास्ता रोकोमुळे सामान्य प्रवाशांचे हाल झाले, असे सांगत नियमावर बोट ठेवत पोलिसांनी अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. या आंदोलकांना सुमारे तीन तास बंद खोलीत ठेवण्यात आले. अखेर सायंकाळी साडेचार वाजता या आंदोलकांना नोटीस देऊन सोडण्यात आले.