तासगाव : तासगाव तालुक्यातील गावागावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यांचा त्रास तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. तालुक्यातील अवैध धंदे येत्या दोन दिवसात बंद न केल्यास दि. 28 मे रोजी तासगाव पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिला आहे. याबाबतचे निवेदन तासगाव पोलिसांना देण्यात आले आहे.सांगली येथील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
तासगाव तालुक्यातही गावागावात काळे धंदे सुरू आहेत. मटका, जुगार यासह अन्य अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांचे खिसे गरम करून अवैध धंदे चालक बिनधास्तपणे आपले धंदे सुरू ठेवत आहेत.तासगाव शहरातही अनेक ठिकाणी कॅफे सुरू आहेत. प्रेमी युगुलांना ‘प्रायव्हसी’ देण्याच्या नावाखाली या कॅफेंमध्ये अनेक अनैतिक प्रकार सुरू आहेत. शिवाय तासगाव शहरातील लॉज म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. शहरातील जवळपास सर्वच लॉजवर अनैतिक व्यवसाय चालतात. एकाही लॉजीचे ‘रेकॉर्ड मेंटेन’ केलेले नसते. अनेकजण आपली हौस या लॉज मध्ये येऊन पूर्ण करतात. पोलिसांचा या प्रकारावर कसलाही पायबंद नाही.
शहरासह तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांविरोधात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. तालुक्यातील सर्वच अवैध धंद्यांना येत्या दोन दिवसात पायबंद घाला अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे. दि. 28 पासून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज तासगाव पोलिसांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शहराध्यक्ष ऍड. गजानन खुजट, ताजुद्दीन तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, स्वप्निल जाधव, अभिजीत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, माजी नगरसेवक बाळू सावंत, खंडू पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.