मागील काही दिवसांत राज्यासह देशभरात उष्णतेची जीवघेणी लाट आली आहे. अनेक प्रांतातील तापमान आज अर्धशतक साजरे करू पाहत आहे. आजतागायत न अनुभवलेला उकाडा यंदा सहन करावा लागत आहे. देशभरात ६० हुन अधिक जण उष्माघातामुळे दगावले आहेत. तर १६०० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिनेअभिनेता शाहरुख खानही यातून सुटू शकलेला नाही. वाढत्या उकाड्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हातावर पोट असलेले मजूर, कामगार, हमाल मात्र या उकाड्यातही घाम गाळत आहेत. उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्याची हानी होऊ नये यासाठी राज्यातील अनेक भागात दुपारच्या वेळेस संचारबंदी लागू केली जात आहे. निसर्गाच्या या कोपाचा सर्वाधिक फटका पशु पक्ष्यांना, जनावरांना बसतो आहे. उष्माघातामुळे जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हाकोकाडा येथील १०० शेळ्या दगावल्या, तर पळूस तालुक्यातील आंधळी येथील एका पोल्ट्री फॉर्ममधील बाराशे कोंबड्या एकाच दिवशी दगावल्या.
भडगाव तालुक्यातील वाघळी शिवारातही २५ मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. याशिवाय अनेकांची गोठ्यात बांधलेली, चरायला गेलेली जनावरे उष्माघाताने दगावली आहेत. कुत्री-मांजरी यांनाही वाढत्या उष्णतेचा प्रचंड त्रास होत आहे. वाढत्या उकाड्यामुळे जनावरांची हानी रोखण्यासाठी पशुधन विभागाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार जनावरांना सकाळी थोडा गारवा असतो अशा वेळेतच चरण्यासाठी बाहेर न्यावे. ११ ते ४ या वेळेत जनावरांना गोठ्यात, सावलीच्या ठिकाणी अथवा हवेशीर निवाऱ्यात ठेवावे. सकाळी ११ ते ४ या वेळेत जनावरांची वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी सावलीतच थंड आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. उकाड्याच्या दिवसांत जनावरांना शक्यतो हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा. जनावरांसाठी स्प्रिंकलर / फॉगर ची व्यवस्था करावी. अधूनमधून घरच्या जनावरांवर पाणी मारावे तसेच शक्य असल्यास त्यांच्यासाठी पंखे अथवा कुलरची व्यवस्था करावी. जनावरांना उघड्यावर अथवा पार्किंग केलेल्या गाड्यांमध्ये जागेत ठेवू नये. या दिवसांत बैलगाडा शर्यंतीचे आयोजन करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. घरी पाळलेली जनावरे आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच असतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्यांची काळजी घ्यायला हवी. आज त्यांच्या प्रकृतीची काळजी आपण घेतली तर भविष्यात ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणार आहेत.