भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा

0
अपेक्षेप्रमाणे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. ९ जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नव्या सरकारचा दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे पंडित नेहरू यांच्या नंतरचे दुसरेच पंतप्रधान आहेत. मोदींना स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी मित्र पक्षांच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केले आहे. मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात तरुणांचा मोठा वाटा आहे. मागील दोन निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही तरुणांनी एनडीएला भरभरून  मतदान केले. आता या नव्या एनडीए सरकारने तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी. कारण गेल्या काही वर्षात  देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मागील काही वर्षात बेरोजगारीचा दर कमालीचा वाढला आहे. शिक्षण व गुणवत्ता असूनही तरुणांच्या हाती काम नाही अशी अवस्था झाली आहे. तरुणांच्या हाती पदवी आहे मात्र नोकरी नाही त्यामुळे तरुणांमध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत तोच तरुण वर्ग रोजगार नसल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकला  तर ती देशासाठी धोक्याची घंटा असेल. या तरुणांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी एनडीए सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.

 

नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी एनडीए सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक तरुण भारतात राहत  आहे. देशातील ६० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४० वयोगटातील आहे म्हणूनच भारताला तरुणांचा देश असे म्हंटले जाते. या तरुणांमध्ये प्रंचड गुणवत्ता असून काम करण्याची ऊर्मी आहे. या तरुण वर्गाला जर रोजगार मिळाला तर त्यांच्या गुणवत्तेचा आणि मेहनतीचा उपयोग राष्ट्र उभारणीच्या कार्यात नक्कीच होईल. तरुणांप्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात  आहेत. दुष्काळाने  बळीराजा  होरपळून निघाला आहे. पाऊस नाही त्यामुळे पीक नाही जे पीक आहे  त्याला भाव नाही अशी अवस्था देशातील बळीराजाची झाली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही सुरू आहे. एनडीए सरकारने पिकांना हमीभाव देऊन स्वामिनाथन आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा. मोदी सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना अनेकदा मोर्चा काढावा लागला. महाराष्ट्रासह काही राज्यातील शेतकऱ्यांवर संपावर जाण्याची वेळ आली तशी वेळ पुन्हा येता कामा नये याची दक्षता सरकारने घ्यायला हवी. देशातील महागाई वाढत चालली आहे.

 

 

महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. वाढत्या महागाईने मध्यमवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडर आणि इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. गगनाला भिडणारी ही महागाई रोखण्याचे काम एनडीए सरकारने करावे. देशातील नागरिकांचा सर्वात जास्त खर्च आरोग्य आणि शिक्षणावर होत आहे. या सरकारने नागरिकांचा शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च कमी करावा. २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराला आळा बसला होता मात्र मागील पाच वर्षात  देशात पुन्हा भ्रष्टाचार वाढला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर सर्जीकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे. नव्या सरकारने तो करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मागील पाच वर्षात सरकारी यंत्रणांचा मोठा दुरुपयोग करण्यात आला आता तरी सरकारने सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग थांबवावा.  नवीन सरकारने दलीत, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षित वाटेल अशी वातावरण निर्मिती करावी.

 

मागील काही वर्षापासून देशात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तर सातत्याने दुष्काळ पडत आहे. नदीजोड प्रकल्प हाच या दुष्काळावर उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तिसऱ्या कार्यकाळात तरी नदीजोड  प्रकल्प कसोशीने राबवायला हवा. जर हा प्रकल्प राबवला तर देशातील कोट्यवधी नागरिकांची तहान भागेल तसेच अनेक राज्यांचा पाणीप्रश्न सुटेल. या सरकारने संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. राष्ट्रीय सुरक्षेसोबतच देशांतर्गत सुरक्षेबाबतही सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. नव्या सरकारच्या शपथविधीच्या दिवशीच जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १० भाविक मरण पावले तर ३३ हून अधिक भाविक जखमी झाले. याचाच अर्थ असा की देशात अजूनही दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. देशातून अजूनही दहशतवाद हद्दपार झाला नाही. जी गोष्ट दहशतवादाची, तीच गोष्ट नक्षलवादाची.  नक्षलवादी अधून मधून डोके वर काढतच असतात. देशात आजही नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. या सरकारने दहशतवाद, नक्षलवाद मोडून काढायला हवा. एकूणच भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हीच नव्या सरकारकडून जनतेची अपेक्षा आहे.
Rate Card
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.