नेहमी ‘महाराज’च का ?

0

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि वाद हे समीकरण काही शमण्याचे नाव घेत नाही. आमिर खानच्या पिके चित्रपटात भगवान शिवाच्या वेशभूषेतील इसमाला भयाने पळताना दाखवण्यात आले होते. चित्रपटातील पात्रांच्या तोंडी हिंदू धर्मातील प्रथा परंपरांविषयी  विवादित संवाद घालण्यात आले होते. देवीदेवतांवर अभद्र विनोद करण्यात आले होते. या सर्वांमुळे देशातील बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या तक्रारीही विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या होत्या. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी त्यावेळी काही संघटनांकडून करण्यात आली होती. भारतात असुरक्षित वाटत असल्याची टिपणी आमिर खानची तत्कालीन पत्नी किरण राव हिने केली होती तेव्हाही आमिर खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विवादित संवाद आणि अन्य एका चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप आमिर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’ चित्रपटावर झाल्याने हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही.

 

ही कसर भरून काढण्यासाठी आणि आपल्या मुलाला मनोरंजन क्षेत्रात आणण्यासाठी आमिर खान नेटफ्लिक्सवर आणू पाहणारा ‘महाराज’ चित्रपटही आता वादात सापडला आहे. १८६२ सालच्या एका विवादित कथानकावर आधारित ‘महाराज’ चित्रपट १४ जूनला नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार होता; मात्र यातील कथित कथानक हे हिंदूंच्या श्रद्धास्थानाला डिवचणारे असून या चित्रपटाच्या माध्यमातून पुष्टिमार्ग संप्रदायाची बदनामी होणार आहे. या चित्रपटामुळे समाजात वाद निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होऊ शकते असे सांगत या चित्रपटाच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत म्हणजे १८ जूनपर्यंत या चित्रपटाच्या प्रसारणावर न्यायालयाने बंदी घातली आहे.

 

Rate Card

या चित्रपटाच्या विरोधात सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून सामाजिक माध्यमांवर हॅशटॅग बायकॉट महाराज मुव्हीचा ट्रेंड चालवला जात आहे. या ट्रेंडच्या माध्यमातून आज अनेक तरुण व्यक्त होत आहेत. ‘आजमितीला अनेक मदरशांतुन मौलवींकडून लहान मुलीसंह मुलांचेही लैंगिक शोषण झाल्याच्या बातम्या अधून मधून वाचनात येत असतात, काही मदरशांतून तर बलात्कारासारख्या घटनाही घडल्या आहेत. ख्रिस्ती पाद्र्यांकडून नन्सच्या केल्या जाणाऱ्या लैगिक छळाच्या बातम्या तर नित्याच्या आहेत असे असताना १८६२ च्या घटनेमध्ये निर्मात्याला एव्हढी रुची का आहे ?’ यासारखे प्रश्न समाजमाध्यमांतून विचारले जात आहेत, तर काही जण हिंदू सहिष्णू असल्यानेच हिंदूंच्या भावनांना नेहमी पायदळी तुडवण्याचे काम बॉलिवूडमधील मंडळी करत असल्याचे सांगत आहेत. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही या चित्रपटाला विरोध केला असून ठिकठिकाणी निदर्शने करून या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे.

भारतीय संविधानाने देशातील प्रत्येकाला त्याचे धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि त्या अंतर्गत प्रत्येकाला त्याच्या धार्मिक भावना जपण्याचा, धार्मिक शिकवणीनुसार उपासना करण्याचा आणि धार्मिक परंपरांचा, श्रद्धास्थानांचा योग्य तो सन्मान राखण्याचा अधिकारही दिला आहे. या धार्मिक भावनांना कोणी पायदळी तुडवू पाहत असेल तर त्याविरोधात सनदशीर मार्गाने त्याचा विरोध करण्याचा अधिकारही इथे प्रत्येकाला आहे. असे असताना हिंदुस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावनांना नेहमीच गृहीत धरले जाते. चित्रपट, वेब सिरीज नाटके, विनोदी मालिका, जाहिराती यांतून हिंदूंच्या प्रथा परंपरा, हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर थुकरट पद्धतीने विनोद केले जातात, त्यांना चुकीच्या पद्धतीने सादर केले जाते. अन्य पंथीयांच्या धार्मिक भावनांचा मनोरंजन क्षेत्रातून अवमान झाला तर ती मंडळी पेटून उठतात. हिंदू मात्र कोणत्याही हिंसक प्रतिक्रिया देत नसल्याने प्रत्येक वेळेस हिंदूंना गृहीत धरले जाते. पूर्वीच्या आणि आताच्याही अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमधून भगवी वस्त्रे धारण केलेल्या, गळ्यात माळा घातलेल्या आणि कपाळावर भस्म अथवा टिळा लावलेल्या साधूला विनोदी पात्र म्हणून दाखवले जात असल्याचे लक्षात येते.

 

या पात्राच्या तोंडी थुकरट संवाद दिले जातात. त्याला विकृत चाले करताना दाखवले जाते. काही चित्रपट आणि वेब सिरीजमधून  साधू किंवा महाराज यांना भोंदू आणि खलनायकाचा स्वरूपात दाखवण्यात येते. प्रमुख खलनायकाचे अध्यात्मिक सल्लागार किंवा गुरु म्हणून साधूच्या वेशातील पात्रांना दाखवण्यात येते. ही पात्रे आपल्या शिष्याला कधी चांगला मार्ग न दाखवता केवळ कुकर्मामध्ये साहाय्यभूत असलेले दाखवण्यात येते. अनेक चित्रपटांतून भगव्या वेशातील रुद्राक्षाच्या माळा धारण केलेले साधू किंवा महाराज भोंदू, स्त्रीलंपट आणि वासनांधांच्या रूपात दाखवले जातात किंवा त्यांना बिनडोक विनोदी स्वरूपात तरी दाखवले जाते. भगवा रंग हा जसा वैराग्याचे आणि त्यागाचे प्रतिक आहे तसा तो शौर्याचेही प्रतीक आहे, म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पताका आणि ध्वज यांसाठी भगव्या रंगाची निवड केली होती. रुद्राक्षाच्या माळा तर साक्षात शिवाच्या गळ्यात पाहायला मिळतात. त्यामुळे शिवभक्तांना त्या पूजनीय आहेत.

 

मोहमायेचा परित्याग करून ईशचिंतनामध्ये आपले उर्वरित अखंड आयुष्य समर्पित करणारे आणि जगाच्या कल्याणासाठी हिमालय आणि तत्सम निर्जन ठिकाणी वर्षोनुवर्षे ध्यानधारणा करणारे साधू संत हे या भारतभूमीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने यांचे विराट रूप आपल्याला पाहायला मिळते. साधूचा वेष धारण करून आपला स्वार्थ साधणारेही कैक असतीलही  मात्र भगवे वस्त्र धारण करणारे सरसकट सर्वच साधू हे काही भोंदू नसतात, त्यामुळे चित्रपट, मालिका आणि हास्यविनोदाच्या कार्यक्रमांतून साधू संतांची उभी केली जात असलेली प्रतिमा मनाला वेदना देणारी आहे. चित्रपट, मालिका आणि  विनोदी  कार्यक्रमांतून साधू संतांच्या प्रतिमा वेळोवेळी मालिन केल्या जात असल्यामुळे सश्रद्ध भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. दारी भिक्षेच्या अथवा माधुकरी मागण्याच्या हेतूने आलेल्या साधुंकडे संशयास्पद रीतीने पाहिले जाऊ लागले आहे. लहान मुले या साधूंची टिंगलटवाळी करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पालघर परिसरात अशाच प्रकारे संशयाने साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती.  त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातून साधूंची निदानालस्ती करून समाजमनात त्याविषयी विष कळवणे निषेधार्हच आहे.

जगन घाणेकरघाटकोपरमुंबई 

संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.