जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर; लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष | तम्मनगौडा रवीपाटील यांची टीका

0
जत : जत तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई व चारटंचाई आहे. जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही, अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तम्मनगौडा रवीपाटील यांनी केली.रवीपाटील म्हणाले की, सध्या जत तालुक्यातील 78 गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे. सध्या पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे टँकर भरणे कठीण झाले आहे. पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत. अपूरा पाणीपुरवठा केला जात आहे. वाड्या वस्तीवरील जनता व जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत.
जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा अत्यंत भीषण प्रश्न आहे. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता. दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते. मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो, चारा अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आमदारांनाही या प्रश्नाचे गांभीर्य नाही असे दिसत आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांचा चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत.जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा दूध हा प्रमुख व्यवसाय आहे. घरटी जर्सी जनावरांचे पालन केले जाते. पाणी व चाऱ्याअभावी दूध व्यवसाय धोक्यात आला आहे.हे अस्मानी संकट टाळण्यासाठी तातडीने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.अनेक गावातील द्राक्ष बागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. कृषी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे फिरकायलाही तयार नाहीत. प्रशासनावर आमदारांचा अंकुश नसल्याने दुष्काळी परिस्थितीत मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र जत तालुक्यात पाहायला मिळत आहे.
Rate Card
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आपण अनेक गावांचा दौरा केला. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री यांना भेटून मानसी 40 लिटर पाणी वाढवून घेतले आहे‌ चाऱ्याचा विषयही त्यांच्याकडे मांडला होता. मात्र त्यानंतर आमदारांनी या विषयावर एकदाही संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी समन्वय साधला नाही.राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची आवर्तने तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे. म्हैसाळ योजनेतून दोड्डा नाल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर पाणी भरण्यासाठी सोय होऊ शकते. त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही रवीपाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.