जत,(संकेत टाइम्स टिम) :भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी विधानसभा उमेदवारीवर दावा केला. तसेच ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी स्वगृही परत यावे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरणार असल्याचे आज पत्रकार बैठकीत सांगितले.
खासदार धनंजय महाडिक व अतुल भोसले यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची आढावा बैठक सांगलीत घेण्यात आली. या बैठकीत कोणताही परिस्थिती आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे तम्मनगौडा रवीपाटील यांनी सांगितले. बाहेरचा उमेदवार कदापि स्विकारणार नाही. भूमिपुत्रालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. दुसऱ्या मतदार संघातील नेत्यांनी जतमध्ये लुडबूड करू नये असा इशारा त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला.
रवीपाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एकमेव जत विधानसभा मतदारसंघांतून पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांना मताधिक्य दिल्याबद्दल पक्ष निरिक्षकांनी निवडणूक प्रमुख म्हणून माझे अभिनंदन केले.
आपण दोन मागण्या पक्षश्रेष्ठींकडे केल्या. भारतीय जनता पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळावी आणि दुसरी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांना परत पक्षात घ्यावे. आगामी विधानसभा निवडणुक आणि पक्ष बांधणीसाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून परत पार्टीमध्ये सक्रिय करून घ्यावें,माजी आमदार विलासराव जगताप यांना आपण स्वतः भेटून पक्षात सक्रिय होण्याबाबत आग्रह धरणार आहे.
जतचा २०२४ चा आमदार भारतीय जनता पक्षाचा होईल . त्यासाठी विलासराव जगताप यांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन विलासराव जगताप यांच्याबद्दलची माझी भूमिका मांडणार आहे, असेही तम्मनगौडा रविपाटील यांनी सांगितले.