सपोनि संदीप मोरे यांचे निलंबन झाल्याशिवाय माघार नाही | तासगाव पोलीस ठाण्यासमोर सलग दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन : आंदोलनाची तीव्रता वाढवणार

0
तासगाव : तालुक्यातील मांजर्डे येथील शीतल मोहिते हिच्या आत्महत्या प्रकरणी चौघांवर पुन्हा दाखल झाला आहे. मात्र केवळ एकाला अटक करून इतरांना ‘अभय’ देण्याचे काम तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी केले. याप्रकरणी मोरे यांचे निलंबन व्हावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पीडित विवाहितेच्या नातेवाईकांनी तासगाव पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मोरे यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा पीडितेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तासगाव येथील शितल हिचा विवाह मांजर्डे येथील सतीश मोहिते यांच्याशी झाला होता. विवाह नंतर अनेक वर्षे मोहिते दांपत्याला मुल नव्हते. त्यामुळे सासरच्या मंडळींकडून शीतलीचा छळ होऊ लागला. तिला मारहाणही होत होती. सततच्या छळाला कंटाळून शितल हिने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी शितलीचा भाऊ विजय धनवडे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शीतल हिचा पती सतीश, सासू सुमन, दीर सचिन व ननंद सुवर्णा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाला त्यावेळी हे सर्वही संशयित आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या ताब्यात होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरे यांनी शितल हिचा पती सतीश यास अटक केले. इतर तीन आरोपींना जबाब घेऊन सोडून दिले.
एका विवाहितेचा जीव गेल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने कारवाई केली नाही. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्यांच्यावर ‘मेहरबानी’ दाखवण्यात आली. त्यांना सोडण्याची ‘कर्तबगारी’ मोरे यांनी दाखवली. याप्रकरणी मोरे यांच्या विरोधात आत्महत्याग्रस्त विवाहितेच्या कुटुंबाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संशयित आरोपी ताब्यात असतानाही त्यांना सोडून देणाऱ्या मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. तासगाव पोलीस ठाण्यातील दि. 11 व 12 जुलै रोजीचे सीसीटीव्ही फुटेज द्या. या मागणीसाठी शितलच्या नातेवाईकांनी गेल्या दोन दिवसांपासून येथील पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेले दोन दिवस पोलीस आंदोलकांशी चर्चा करत आहेत. मात्र चर्चेतून मार्ग निघाला नाही. पोकळ आश्वासने देऊन आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मात्र जोपर्यंत मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. उद्या बुधवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.