जत : जत येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे तालुक्यातील जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी व सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले.शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन करून संचालक प्रकाश जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जतचे माजी नगरसेवक तथा सुभाषदादा अर्बन निधीचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, साई हॉस्पिटलचे अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जिल्हा बँकेचे जतचे तालुका अधिकारी राजू कोळी, जत मार्केट यार्ड शाखेचे सचिव तानाजी काशीद, डॉ. बसवराज उटगी, डॉ. शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले,राज्यातील महायुतीच्या शासनाने आरोग्य सुविधेवर विशेष भर दिला आहे. गरीबांवर मोफत उपचार होत आहेत. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत साई हॉस्पिटलने राबविलेला उपक्रम अन्य सामाजिक संस्थांना दिशा देणारा ठरणार आहे.
मोहनभैय्या कुलकर्णी यांनी, सध्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून सकस आहार, व्यायाम व आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. चंद्रकांत गुड्डोडगी यांनी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत असणारे डॉ. बसवराज उटगी व डॉ. शिवानंद बिरादार यांचा परिचय करून देत पुढील एक वर्ष जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
जत : साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आरोग्य शिबीर तपासणी प्रसंगी बोलताना संचालक प्रकाश जमदाडे. यावेळी उपस्थित मोहनभैय्या कुलकर्णी, चंद्रकांत गुड्डोडगी आदी