गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. अनादी काळापासून ही परंपरा अखंड चालत आली आहे. गुरु शिष्याची अनेक उदाहरणे अगदी शालेय जीवनापासून आजतागायत आपण अभ्यासली आहेत. सामान्यांसाठी जसा दिवाळी दसरा तसा साधक आणि शिष्यांसाठी गुरुपौर्णिमा उत्सव. साधकाची भगवंताशी भेट घडवून आणतो तो गुरु. अर्थात नुसती भेट घडवून आणणे नव्हे, तर त्या भेटीसाठी साधकाला पात्र बनवण्याचे काम गुरु करत असतात. दगडाला हातोड्याचे आघात देऊन त्यातून देवतेचे सौंदर्य साकारण्याचे काम जसा एक शिल्पकार करतो तसे साधकावरील दोषांचे आणि अहंकाराचे आवरण नष्ट करून त्याच्यातील परमात्म्याच्या अंशाला जागृत करण्याचे काम गुरु करत असतात.
साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करून ते साधकाला शिष्य आणि शिष्याला भक्त बनवतात. जोपर्यंत आपल्या शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही तोपर्यंत त्यांनाही चैन पडत नाही. असे हे गुरु शिष्याचे आगळे नाते. गुरु करत असलेल्या कृपेची परतफेड करणे खरेतर शक्यच नाही; मात्र तरीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा देऊन गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा शिष्य प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या जीवनात कधीनाकधी कोणीनाकोणी गुरुस्वरू पात भेटतेच. यंदाच्या गुरुपौर्णिमेला त्यां च्याप्रती न चुकता कृतज्ञता व्यक्त करूया !
– नरेश घरत, चेंबूर