जत:भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवार दि. २१ ऑगस्टपासून पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असल्याची माहिती, यात्रेचे संयोजक बाजचे माजी सरपंच संजय गडदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
संजय गडदे म्हणाले की, ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा अफलातून यशस्वी झाला आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी स्वतः दीडशे किलोमीटरहून अधिक प्रवास पायी केला आहे. या पदयामुळे संपूर्ण तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. आता पश्चिम व उत्तर भागातून ही पदयात्रा जाणार आहे.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी जत तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री लक्ष्मी देवी खलाटी येथून दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ होणार आहे. जिरग्याळ, मिरवाड, डफळापुर बेळुंखी, ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास आहे. बाज येथे पहिल्या दिवशी मुक्काम करण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी अंकले, डोरली, हिवरे, कुंभारी. तिसऱ्या दिवशी कोसारी, कासलिंगवाडी वाळेखिंडी. चौथ्या दिवशी शेगाव, बनाळी, निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी पाचव्या दिवशी सुरडी ते गुड्डापूर सांगता समारंभ होणार आहे.
जत तालुक्यातील जनता व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संजय गडदे यांनी केले आहे. यावेळी भाजप विद्यार्थी सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष पिरु कोळी उपस्थित होते.