सकाळी शाळेला जातो म्हणून सॅक अडकवून बाहेर पडायचं ते शाळेला जायचंच नाही. धापा टाकत थेट स्पॉटला पोहोचायचं. सॉरी जानू म्हणून मिठ्या मारायच्या. नंतर गळ्यात पडायचं. गालावर गाल घासत खचाखचा सेल्फी घ्यायच्या. पोरीला दोन्ही हातावर उचलत रिल्स करायच्या..मग तास.. दोन तास.. तीन तास.. चार तास बाईकच्या सिटवर बसून दोघांनी रोमान्स करायचा..अशा तर्हेनं ‘शाळा’ सुटली की मग जानू मिस यू म्हणत परत घरी यायचं..हा काही हिंदी सिनेमातला रोमँटिक सिन नाही. सांगलीच्या कोपर्या कोपर्यावरच्या पोरापोरींचा रोजचा लाईव्ह सिन आहे.
गुडघ्यावर फाटलेल्या जिन्स त्या पण गुडघ्याच्या पार वर गेलेल्या, बनियनसारखे शर्ट ते पण खालचं एकच बटन लावलेले, उंदरानं कुरतडल्यागत केलेली हेअर स्टाईल, पाण्यावर रॉकेल पडल्यावर दिसणार्या इंद्रधनुषी कलर्सचे गॉगल, हातात हायफाय मोबाईल, कानात हेडफोनच्या डिबर्या, पायात स्लिपर..आणि पुंगळी काढलेल्या गाड्या..सांगलीला असल्या मोकाट पोरांनी दमवून सोडलं आहे. पोरं अशी तर पोरी एक काकण सरस.
शाळा कॉलेजला म्हणून भल्या सकाळी घराबाहेर पडलेली आपली पोरं खरंच शाळेत असतात का? की थापा मारुन कुठं दुसरीकडंच दिवस काढतात? दिवसभर ती नेमकं करतात काय? यांचे दोस्त कोण? मोबाईल घ्यायला यांच्याकडं पैसा कुठनं आला? दिवसरात्र पोरं मोबाईलमध्ये काय बघतात? कुणाला कसले एसएमएस पाठवतात? घरच्या कसल्या जबाबदार्या घेतात? यांचं भविष्य काय..हे सारं बघण्याची, तपासण्याची जबाबदारी कुणाची? आपल्या पोरापोरींची लक्षणं काही बरोबर नाहीत असं वाटलं तर त्यांना सुधारायची जबाबदारी कुणाची? पोरं ऐकतच नाहीत असं म्हणून हात वर केले की झालं का?..हीच पोरं पुढं पार वाया जातात. व्यसनाधिन होतात. मोकाट सुटतात. गुन्हेगारीत अडकतात. कर्जबाजारी होतात. दुर्धर आजारात फसतात. तीशीच्या आतच मरायला टेकतात तर बरेच जण दुर्देवानं आत्महत्या पण करतात. समाजाचं हे चित्र भयावह आहे. ते सुधारायची जबाबदारी सार्या घटकांची आहे.
———-
सांगलीतील काही जागा तर मोकाट पोरापोरींनी बदनाम करुन टाकल्यात. बघणारांनाच लाज वाटावी इतके बिनधान चाळे सुरु असतात. काही बोलायला जावंच तर दमदाटी होते. सांगलीत नदीकाठावरील सारे घाट, पुलांच्या खालची शेतं, घाटावरची मंदिरं, धामणी रोड, हरीपुर रोड, माधवनगर-कर्नाळ रोड, कुपवाड-बुधगाव रोड, भारत सुरगिरणी ते मिरज रोड, सांगलीतील सारी उद्याने, पडकी घरे, अर्धवट बांधकामे, उपनगरांमधील तुरळक वस्तीच्या जागा, बसस्थानक, हॉटेल्स, लॉज, शाळा-कॉलेज-होस्टेल्सचे कॅम्पस.. स्मोकिंगपासून ड्रिकिंगपर्यंत आणि शुटिंगपासून फायटींगपर्यंत सारे प्रकार रोजरोस सुुरु आहेत.
नंदू गुरव,सांगली