सांगली : मिरज तालुक्यातील निलजी येथे महिलेवर अत्याचार करून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेत सामील त्याच्या अन्य तीन साथीदारांना पकडण्यासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
याप्रकरणी गजपती शिसफूल भोसले (वय ३०, रा. आंबेडकरनगर, बोलवाड, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. दि. २६ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चौघे संशयित पीडित महिलेच्या घरात घुसत महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करत घरातील सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्यातील एकाने घृणास्पद कृत्य करत महिलेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा पथक संशयितांचा शोध घेत असताना एक संशयित गजपती भोसले हा लिंगनूर-बेळंकी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तेथून त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी निलजी येथील चोरी आणि अत्याचार घटनेची पोलीसांना कबुली दिली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते.पथकाने सखोल तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन, रूपाली ठोंबरे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, आमसिद्ध खोत, रोहन गस्ते, अजय बेंदरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.