विजयवाडा : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या हॉस्टेलमधील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले. या प्रकरणी बी.टेकच्या अंतिम वर्षाच्या विजय कुमार याला अटक करत फोन, लॅपटॉप जप्त केला आहे.छुप्या कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांची विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत जवळपास ३०० फोटो व्हिडीओ लीक झाले असून, या प्रकरणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रकरण दाबले?
■ कॉलेजला आठवडाभरापूर्वी याची माहिती देण्यात आली होती; परंतु, कॉलेजने हे प्रकरण दाबले.
त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलनाच्या बातम्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून व्यवस्थापनाने कॉलेजचे दरवाजे बंद केले होते.
मात्र, विद्यार्थिनींनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांना याची माहिती मिळाली.
नेमके काय केले?
- विजयने सर्वांत आधी ओयो रूममध्ये आपल्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याने मित्रांसह तिला ब्लॅकमेल करून वसतिगृहात कॅमेरा बसविण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. ● या घटनेची माहिती मिळताच राज्य सरकारचे मंत्री नारा लोकेश यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.