नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हेही त्यांच्यासोबत होते.
अजित पवार यांनी त्यांच्या सुरू असलेल्या “जन सन्मान यात्रे”चा भाग म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात महिला, शेतकरी आणि तरुणांना संबोधित केले. राखी बांधल्यानंतर महिलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “तुम्ही दिलेला पाठिंबा सदैव स्मरणात राहील. हे पाठबळ मला तुमच्यासाठी काम करण्यास प्रेरित करेल”. अडीच कोटी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी गुलाबी रिक्षा योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा समावेश आहे.
२२ ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्रवादी हेल्पलाइन– ९८६१७१७१७१ ला संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हेल्पलाइन सुरू झाल्यापासून एका आठवड्यात विक्रमी २ लाख ६० हजार लाख प्रश्न प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १ लाख ६० हजार प्रश्न लोककेंद्रित कल्याणकारी योजनांशी संबंधित आहेत आणि त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रवादी हेल्पलाइनचे महत्त्व सांगून जनतेने महायुती सरकारच्या योजना समजून घेऊन त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ‘संत्रा’ आणि ‘मोसंबी’ पिकांचे झालेले नुकसान पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा येथे हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण विकास कामांचाही उल्लेख केला. ज्यामध्ये वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या मंजुरीचा समावेश आहे. ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर (सुमारे ९ लाख एकर) क्षेत्र ओलीताखाली येईल. विदर्भात यामुळे बदल घडू शकेल. विदर्भाचा अनुशेष आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला त्यांच्या आधीच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली.
अजित पवार यांनी काल मालवणला भेट दिली जिथे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करू आणि दोषींना शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे.सामाजिक न्याय आणि महिला सुरक्षेबाबतच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करताना अजित पवार म्हणाले की, “महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो, हा अक्षम्य गुन्हा मानून फाशीच्या शिक्षेसह कठोर शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.” निवडणुकीच्या काळात राजकारण करण्यासोबतच विविध जातींमध्ये एकोपा राखण्याचं महत्व त्यांनी समजावून सांगितलं आहे. अजित पवार यांनी ‘शेवटच्या व्यक्तीला’देखील लाभ व्हावा यासाठी अंत्योदयबाबत आपला संकल्प अधोरेखित केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीतील जागावाटपाची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही जागा वाटपाबाबात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण केली आहे. जेव्हा सर्वकाही निश्चित होईल, तेव्हा आम्ही संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करू.”नागपुरात आज सरकारचा माझी लाडकी बहीण कार्यक्रम पार पडला. बालेवाडी येथील १७ ऑगस्टच्या कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या १ कोटी ७ लाख लाभार्थ्यांना शासनाने निधी थेट बँक खात्यात हस्तांतरित केला होता. एकूण ३२२५ कोटी ७९ लाख रुपयांचं वितरण करण्यात आले होते. आज, ५२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना १५६२ कोटी ८५ लाख रुपयांचा हप्ता वितरीतकरण्यात आला आहे.नागपुरात आज एक भव्य बाईक रॅली काढण्यात आली ज्यात हजारो तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता.