तासगावात निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या सवंग लोकप्रिय घोषणा

0
14

तासगाव : दहा वर्षांपूर्वी त्यावेळीची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नवीन बाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र या बांधकामात कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे हे काम बंद पडले आहे. सहा महिन्यात नवीन बाजार समिती सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने बाजार समिती निवडणुकीत दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल करतानाच राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्यावेळी लोकप्रिय घोषणा करून लोकांना फसवले जात असल्याचा आरोप तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

 

 

यावेळी महादेव पाटील म्हणाले, सध्या सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुका जवळ आल्या की रेटून खोटं बोलायचा उद्योग तालुक्यातल्या काही मंडळींकडून सुरू असतो. सध्या दोन्ही तालुक्यात तरुणांना उद्योग देण्यासंदर्भातल्या गोष्टींचे पोस्टर लावले जात आहेत. भविष्यात रोजगार निर्मिती संदर्भात खोटी आश्वासने दिली जात आहेत.

मात्र तासगाव तालुक्यातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या बेदाणा उद्योगालाच अडचणीत आणण्याचा उद्योग तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यावेळच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा गाजावाजा करून तासगाव सांगली रस्त्यालगत भव्य – दिव्य जागतिक दर्जाचे बाजार समिती उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मोठा कार्यक्रम घेऊन त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.

मात्र दहा वर्षानंतर आज काय परिस्थिती आहे, हे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर करावे. या बाजार समितीसाठी तासगाव बाजार समितीचे कोट्यावधी रुपये स्वाहा करण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे असणाऱ्या ठेकेदाराला हाताशी धरून बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांची नुकसान केले. हे आम्ही म्हणत नसून शासनाने तीन-तीन वेळेला नेमलेल्या समितीने मान्य केले आहे. लेखापरीक्षकांनी याच्यावर फौजदारी करण्याची मागणी केली आहे.

आज नवीन बाजार समिती आवारात कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारती या अक्षरशः भगनावस्थेत आहेत. बाजार समितीचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एका वर्षाच्या आत संबंधित बांधकाम पूर्ण करून नवीन मार्केट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला तर दीड वर्ष झाले, मात्र त्यात काहीही बदल झाला नाही.

पाटील म्हणाले, निवडणूकीच्या तोंडावर नवनवीन लोकप्रिय घोषणा करून तरुणांना बेरोजगारांना फसवण्यापेक्षा तालुक्याच्या अर्थकारणाची नाडी असणाऱ्या बेदाणा मार्केटला उर्जित अवस्था आणण्यासाठी तात्काळ नवीन बेदाणा मार्केटचे काम पूर्ण करावे. कृषी विभागाच्या जागेत व्यवसायिक पेट्रोल पंप तसेच शॉपिंग मॉल सुरू करून बाजार समितीचे उत्पन्न तात्काळ वाढवणे शक्य आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न करावेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here