महिला फौजदाराकडं चाकू घेऊन धावून गेले; तिघींवर गुन्हा
सोलापूर : गुन्हा दाखल झाल्याने ताब्यात घेण्यासाठी घरी गेलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकांवर चाकू घेऊन धावा केल्याप्रकरणी, तीन महिलांसह चौघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजीवनी संगेश व्हट्टे (नेमणूक सदर बझार पोलिस ठाणे) या सोमवारी सकाळी ११:४५ वाजता शिवाजी नगर मोदी खाना येथील पत्त्यावर गुन्हा दाखल झालेल्या हफिस शेख यांच्या घरी गेल्या होत्या.
तेव्हा घरातील महिलांनी तुम्ही हफिस शेख यांना का शोधताय? असा प्रश्न केला. तुमची हिम्मत कशी झाली, आमच्या घरी यायची? मी पत्रकार आहे, तुम्हाला माहिती नाही का?. माझी मुलगी वकील आहे, तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही असे कसे जबरदस्ती घरी येता? असे म्हणत मोठ मोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या एका महिलेने जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील एक केशरी रंगाचा मूठ असलेला चाकू घेऊन संजीवनी व्हट्टे यांच्या अंगावर धावून गेली. एका हाताला नखाने बोचकारून लाथ मारली, त्यानंतर महिला पोलिस हवालदार माड्याळ यांना शिवीगाळ करून पायाने लाथ मारली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद संजीवनी व्हट्टे यांनी दिली आहे.