संख्याबळावरच ठरेल मविआचा मुख्यमंत्री
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर संख्याबळावर ठरविला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट करत, मविआमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यासंबंधी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम दिला. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर पवार म्हणाले, निवडणुकीनंतर एकत्र बसून एका विचाराने निर्णय घेण्याची पद्धत यावेळी मुख्यमंत्री ठरविताना घेतली जाईल. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांनी त्याचा निर्णय घ्यायचा आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीत श्रेयवाद रंगल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी मिश्कीलपणे, भाऊ लढतात, ही चांगलीच गोष्ट आहे.
जागावाटपावर आजपासून तीन दिवस चर्चा
आज, गुरुवारपासून तीन दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते जागावाटपाच्या विषयावर चर्चा करणार आहेत. शेकाप, माकप व भाकप या पक्षांचीही काही मते आहेत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ठ करून घेतले आहे, असेही पवार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना त्यांनी आणली असली तरी सत्तेचा गैरवापर हे सरकारच्या कामाचे सूत्र असून त्याच्या दुष्परिणामांची मांडणी आम्ही निवडणुकीत करू, असे त्यांनी सांगितले. राज्यात तिसरी आघाडी होत असली तरी त्याबद्दल चिंता करत नाही, असेही पवार म्हणाले