वडूज : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन, योजनेला गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यातील निमसोड येथील दांम्पत्याने केले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे.
प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. विविध आधार कार्डाचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे प्रतीक्षा जाधव हिने पती गणेश घाडगे याच्या मदतीने एकूण ३० अर्ज भरले. त्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या तिच्या खात्यावर वडूज येथील माणदेशी महिला सहकारी बँकेत पैसेही जमा झाले.
अधिक पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तिने ही फसवणूक केल्याने प्रतीक्षा आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.