गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असतानाच शहरात मागील तीन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हे तीनही खून वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसी खाक्याला न जुमानता गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे, विशेष म्हणजे पोलिसांवर देखील हल्ले झाले आहेत. त्यामुळे आपले शहर खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच मध्यरात्री गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात ‘मोक्का’ कारवाई केल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांनी तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. दरम्यान, हडपसर भागात हॉटस्पॉट दिला नाही, म्हणून चक्क खून करण्यात आला.शहरात गैंगवॉरचे सत्र सुरूच आहे मे महिन्यात त्याच्यासह साथीदारावर खुनी हल्ला झाला. त्यातून तो बचावला, पण साथीदाराचा मृत्यू झाला होता. यातून वाचल्यानंतर पुन्हा एकदा कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा व्हिडीओ ‘सोशल’वर व्हायरल झाला असून, त्यात अत्यंत निघृणपणे दोघेजण त्याच्यावर कोयत्याने वार करत असल्याचे दिसत आहे.
आधी वाचला; भरदिवसा पुन्हा कोयत्याने वार केला
भररस्त्यात बुधवारी (दि. ४) सकाळी ही घटना घडल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सागर चव्हाण असे खुनीहल्ल्यात जखमी झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही घटना किरकटवाडी फाट्याजवळील सीडब्ल्यूपीआरएस कॉलनी गेटच्या समोर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घटली.
अधिक माहितीनुसार, भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सचिन जाधव व त्याच्या साथीदारांनी सागर चव्हाणला मारण्याचा कट रचला होता. कर्वेनगर भागातील गांधी भवन परिसरात १७ मे च्या मध्यरात्री सागर सावीदारांसह थांबला असताना टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. यात तो बचावला; तर, त्याचा साथीदार श्रीनिवास वत्सलवार याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सागर चव्हाण याच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. आरोपीनी एक महिन्यापूर्वी सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर याला रिक्वेस्ट पाठवली, महिनाभर चॉटिंग केली. आरोपी आणि सागर यांच्यात मंगळवारी (दि. ३) रात्री बोलणे झाले आणि बुधवारी सकाळी खडकवासला परिसरात भेटायचे ठरले. त्याप्रमाणे सागर चव्हाण एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाट्याजवळ आला, ‘तू कधी येतेय, आम्ही पोहोचलोय’ असा मेसेज करून त्याने करंट लोकेशन पाठवले. तिथेच त्याचा घात झाला. सागर चव्हाण आणि त्याचा मित्र दुचाकीवर थांबलेले असताना दुसऱ्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेले अज्ञात हल्लेखोर दुचाकीला लाथ मारले. यात सागर चव्हाण खाली पडला, त्याच्यावर कोयत्याने सपासप वार सुरू केले. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून दुचाकी घटनास्थळी सोडून किरकटवाडीच्या दिशेने आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी एकाला अटक केली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
काळ पोलिसांच्या परीक्षेचा
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आलेला असताना, शहरात अशाप्रकारे एकामागोमाग खून होत आहेत. विधानसभा निवडणुकाही तोंडावर असल्याने काही आरोपीना राजकीय फायद्यासाठी जामिनावर बाहेर काढले गेल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसह शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गेल्यावर्षी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी कोयता गँगचा डीमोड केल्याने, त्यांच्या कामगिरीवर गणेश मंडळांनी देखावे केले होते. मात्र, एका वर्षांच्या आतच कोयता गैंगनी पुन्हा डोके वर काढल्याने यंदाचा गणेशोत्सव सोहळा पोलिसांची परीक्षा घेणारा ठरणार आहे.