कान गच्च.. डोळे बधिर.. डोक सुन्नं..!

0
2

लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी झाले. सालाबादप्रमाणे राजारामपुरीतील जवळपास ४० मंडळांनी जल्लोषात मिरवणूक काढून बाप्पांना मंडळाच्या स्टेजवळ आणून बसवले. मात्र शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रचंड आवाजाच्या साऊंड सिस्टीम, एचडीसह लेसर लाईटचा झगमगाट झाला. यामुळे कान गच्च आणि डोळे बधीर झाले. आगमन मिरवणूकीचा हा ट्रेलर होता. मात्र २८ ते ३० तास चालणाऱ्या विसर्जन मिरवणूकीत पूर्ण पिक्चर पाहण्यास मिळणार आहे. जल्लोष करा.. पण आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

 

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. गणेशोत्सवात विविध विषयांचा घेऊन देखावे करणे, तांत्रिक देखावे, प्रबोधनात्मक देखावे, आकर्षक गणेशमूर्ती, सजावट, स्पेशल लाईट इफेक्ट यामुळे कोल्हापुरात दहा ते अकरा दिवस केवळ मनोरंजनच आणि मनोरंजच असते. अबालवृध्दांमध्ये जल्लोषी वातावरण असते. मंतरलेले हे दिवस लवकर संपूच नये असे सर्वांनाच वाटत असते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे, त्यांचे कार्यकर्ते तर दोन महिने परिश्रम घेऊन सजावटी करत असतात.

 

 

राजारामपुरी परिसरातील बहुतांश मंडळे विसर्जन मिरवणूकीत होणारी गडबड, गोंधळ, गर्दी याला फाटा देऊन मिरवणूकीत जल्लोष करतात. मोठ मोठी स्ट्रक्चर उभी करून साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टसह जल्लोष करतात. यंदाच्या आगमण मिरवणूकीत मोठया कर्णकर्कश आवाजाचे साऊंड सिस्टीम, डोळ्यांना त्रास होतील असे लेसर लाईट इफेक्ट यामुळे मिरवणूकीचा आनंद घेण्यासाठी आलेले तरुण,महिला, लहान मुले यांचे कान गच्च झाले, मिरवणूकीतून बाहेर पडल्यानंतर अनेकाना आवाजही ऐकू येत नव्हते. डोळ्यावर पडलेल्या प्रखर लाईटने डोळे बधीर आणि डोक अगदी सुन्न झाले होते.

 

एकामागोमाग एक अशा ४० मंडळांचे साऊंड सिस्टीम कानावर आघात करत होते. काही मद्यधुंद तरुण, गांजाचे व्यसन करणारी पोरं अगदी बेभान होऊन नाचत होती. पोलिसांनी याबाबत सर्व मंडळांना नियमांचे उल्लंघन होऊ नये, या सूचना दिल्या होत्या. कोणती खबरदारी घ्यावयाची हे सुद्धा सांगितले होते. काही मंडळांनी या सुचनांकडे दुर्लक्ष करून मनमानी केली. अशा मंडळाच्या बाबतीत पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.

 

विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष..
गणेश आगमन मिरवणुकीत शनिवारी कानठळ्या बसणाऱ्या साऊंड सिस्टीमने तोडलेले नियम, प्रखर लाईट, लेसर सिस्टीम यामुळे डोळ्यांचा झालेला त्रास हे चित्र खूपच विदारक आहे. आगामी अनेक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यंदा आलेला गणेशोत्सव पाहता विसर्जन मिरवणुकीतही जल्लोषात होणार याचा अंदाज बांधला जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here