भारताचा २९ पदकांचा विक्रम

0
11

भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य एकूण विक्रमी २९ पदकांनी पॅरिस पॅरालिम्पिकमधील आपली मोहीम गाजवली. पुरुषांच्या भालाफेकमधील एफ ४१ या श्रेणीतील अंतिम फेरीत नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाल्या. भारतीय खेळाडू नवदीप सिंहचे रौप्य पदक सुवर्णमध्ये परावर्तित करण्यात आले. कारण, सुवर्णपदक पटकावणारा इराणचा खेळाडू सादेघ बेत सयाहला वादग्रस्त झेंडा दाखवल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले.

 

चार फूट चार इंच उंचीचा नवदीप भालाफेकच्या एफ ४१ श्रेणीत भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता ठरला आहे. नवदीपनंतर काही मिनिटांतच महिलांच्या २०० मीटर दृष्टिबाधित टी १२ श्रेणीत अॅथलिट सिमरनने कांस्य पदकाची कमाई केली.उंचीने लहान असलेल्या खेळाडूंचा टी १२ श्रेणीत समावेश करण्यात येतो. आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या हरयाणाच्या नवदीपने २०१७ मध्ये मैदानात पाऊल टाकल्यापासून पाचवेळा राष्ट्रीय पदकाची कमाई केली आहे. २०२४ च्या सुरुवातीला त्याने जपानमधील जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. या स्पर्धेतील लय कायम राखत तो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाला.

 

नवदीपने तिसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटरने पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. इराणच्या सयाहचा दुसरा प्रयत्न ४६.८४ मीटरपर्यंत पोहचला. सयाहने पाचव्या प्रयत्नात ४७.६४ मीटरपर्यंत धडक मारत नवदिपचा पॅरालिम्पिक विक्रम मागे टाकला. मात्र, भालाफेकल्यानंतर पाय सीमारेषेच्या बाहेर गेल्याने पंचांनी सयाहला पिवळे कार्ड दाखवले, नवदीपचा अंतिम व सहावा प्रयत्न अपात्र घोषित करण्यात आला. सहायने सुवर्णपदक मिळवले, तर नवदीपला रौप्यवर समाधान मानावे लागले. मात्र, सामन्यानंतर वादग्रस्त झेंडा फडकावल्याने सयाहला अपात्र ठरवून त्याच्याकडील सुवर्णपदक नवदीपकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यानंतर चीनच्या सूनचे (४४.७२ मीटर) कांस्य हे रौप्यमध्ये परावर्तित करण्यात आले आणि इराकच्या विल्डन नुखाईवीला (४०.४६ मीटर) कांस्य पदक देण्यात आले. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या नियमानुसार कोणताही अॅथलिट मैदानात राजकीय संदेश देऊ शकत नाही. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नवदीपला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.महिला अॅथलिट सिमरनने आपला जोडीदार अभय सिंहसोबत धाव घेत २४.७५ सेकंदांनी सर्वश्रेष्ठ कामगिरीद्वारे कांस्य पदक जिंकले. जन्मानंतर १० आठवडे इन क्युबेटरमध्ये सिमरनला राहावे लागले होते. मात्र, या काळात सिमरन दृष्टिबाधित असल्याचे आदलन आले.

 

२९ पदकांच्या बळावर भारतीय चमू सध्या पदक तालिकेत १८व्या स्थानावर उभा आहे. गत पॅरालिम्पिकमध्ये ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यने भारताने तालिकेत २४वे स्थान गाठले होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here