एसटी बसला दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघात पोलीस कर्मचाऱ्यांची मुले असलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दि. ८ रोजी एक वाजेच्या सुमारास कन्नड चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरी जवळ घडली. या अपघातात मृत झालेल्या युवकांची नावे आदित्य शेखर राहिंज (वय १७) व ओम श्रावण तायडे (वय २३, दोघे राहणार पोलीस कॉलनी कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, कन्नडमधील पोलिस कॉलनी येथील आदित्य शेखर राहिंज (वय १७) व ओम श्रावण तायडे (वय २३) हे दोघे रविवार दि. ८ रोजी एक वाजेच्या सुमारास स्कुटी क्रमांक एमएच २० एफओ ९१९९ या दुचाकीवरून अंधानेरकडे जात होते. याचवेळी कन्नड आगाराची वडनेर-कन्नड (एमएच २० बीएल ०८८३) ही एसटीबस समोरून अंधानेरकडून कन्नडकडे येत असतांना दोन्ही वाहनांची धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की स्कूटी सरळ बसखाली गेली आणि मोठा अपघात झाला. या अपघाताचे वृत कळताच सहा. फौजदार जयंत सोनवणे व पोकॉ. दिनेश खेडकर यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने बसखालून गंभीर जखमी झालेल्या युवकांना बाहेर काढण्यात आले.
आदीत्य राहींज हा जागीच ठार झाला होता तर ओम तायडे हा गंभीर जखमी होता. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दोन पोलीस पुत्रांचा अपघात झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सपोनि कुणाल सूर्यवंशी, ग्रामीण सपोनि रामचंद्र पवार तसेच पोलीस कॉलनीतील महिला मुलांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. झालेल्या दुर्घटनेमुळे पोलीस कॉलनीसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी शोक व्यक्त करत आहे.
सलग दोन दिवसांत दोन अपघात
याच रोडवर दि. ७ रोजी ट्रक दुचाकीचा अपघात होऊन १५ वर्षीय विद्यार्थी ठार झाला होता तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अपघात होऊन दोन तरुण ठार झाल्याने या रोडवर दोन दिवसात दोन अपघात झाले. यामुळे हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.