एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडीस आली आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ही घटना घडली आहे.
मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे. नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन जैतु पाटील (वय ३५), अनिशा मदन पाटील (वय ३०)आणि विनायक मदन पाटील (वय १०) अशी तिघांची नावे आहे. चिकनपाडा गावात घराच्या मागील भागात असलेल्या ओढ्यात तिघांचे मृतदेह रविवारी सकाळी आढळून आले. तिघांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झालेली अनिशाही सात महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती समोर आली आहे.
पाटील कुटुंब गेल्या दहा ते १२ वर्षांपासून या परिसरात वास्तव्याला होते. आज पहाटे त्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.