बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाकडून रोख एक लाख रुपये व चार लाख रुपयांचा धनादेश घेणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) घडली. या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच शहरातील एकाकडे केलेली अधिक रकमेची मागणी पूर्ण न झाल्याने धमकी देणाऱ्या दुसऱ्या एका महिलेलादेखील अटक करण्यात आले होते.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाची वकील राठोड (३०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या हॉटेल चालकाशी ओळख झाली. नंतर राठोड याने या व्यावसायिकाची एका महिलेशी ओळख करून दिली. त्यानंतर व्यावसायिकाचे महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याबदल्यात महिलेला पैसेही दिले. काही दिवसांनी महिलेने काही ना काही कारणासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार व्यावसायिकाने या महिलेला ७१ हजार ५०० व ओळख करून देणारा वकील राठोड याला १५ हजार रुपये दिले. या प्रकरणी व्यावसायिकानेएमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
बलात्कार केल्याची दिली धमकी
• महिलेने या व्यावसायिकाशी पुन्हा-पुन्हा संपर्क साधून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. महिलेने पाच लाख रुपयांची मागणी केली असता व्यावसायिकाने नकार दिला. • मात्र महिलेने पैशाचा तगादा सुरु ठेवत ‘तू मला पैसे दिले नाही तर तुझ्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तसेच माझी मुलगी लहान असून तिच्यावरदेखील बलात्कार केल्याचा पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करून अडकविण्याची धमकी दिली.
दोघेही अडकले सापळ्यात
• वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने पैसे देण्यासाठी एका दुकानावर भेटण्याचे ठरविले. त्यासाठी एक लाख रुपये रोख व चार लाख रुपयांचा धनादेश त्याने तयार करून एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले व सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार सदर महिलेला पडण्यासाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे दुकानावर महिला व वकील राठोड आला. त्यांना रोकड व धनादेश दिल्यानंतर व्यावसायिकाने इशारा केला व पोलिसांनी महिला तसेच राठोड याला रंगेहाथ पकडले.