रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कर्जत तिहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी २४ तासांतच छडा लावला असून, आरोपीने नियोजनपद्धतीने हा हत्येचा कट रचला होता, अशी माहिती मंगळवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीने मामाच्या घरी गेल्याचे भासवून रात्री पुन्हा परत येऊन तिघांची हत्या केली, मृतदेहांची विल्हेवाट लावली अन् पुन्हा मामाच्या घरी जाऊन झोपी गेला. रात्री हत्या करून आलेल्या आरोपीने सकाळी सहा वाजता
देवपूजाही केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत ८ सप्टेंबररोजी चिकनपाडा येथे राहाणारे ३५ वर्षीय मदन पाटील व त्याची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच त्यांचा मुलगा विवेक मदन पाटील यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती. सापडलेल्या तीनही मृतदेहांवरील झालेल्या घावाच्या जखमा दिसत असल्याने हे हत्याकांड की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत असताना, रायगड पोलिसांनी तपास करून हत्याकांडाचा छडा लावला.
मामाच्या घरी गणेशोत्सवासाठी गेला !
आरोपी हनुमंत याने हत्त्येसाठी पूर्व तयारी केलेली होती. हे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गणेशोत्सव सुरु असल्याने आरोपी हनुमंत हा आपल्या चिकनपाडा गावापासून तीन किमीवरील पोशीर येथे मामाच्या घरी गणेशोत्सवानिमित्त जाऊन आपण रात्रभर येथेच असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. त्याने रात्रीचे जेवण घेऊन आपल्या मामाला आपण माळ्यावर झोपण्यास जातो, असे सांगितले.
सकाळी गणपती पूजेसाठी उपस्थित
आरोपी हनुमंत हा पुन्हा आपल्या चिकनपाडा येथे येऊन त्याने कुऱ्हाडीने वार करून भाऊ, भावजय व पुतण्याची हत्या केली. त्याने तीनही मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिले जेणे करून ते पाण्यात वाहून जातील. त्यानंतर रात्रीच आरोपी पुन्हा मामाकडे येऊन झोपला व सकाळी सहा वाजता गणपती पुजेसाठी उपस्थित राहिला.
रात्रीच्या सुमारास आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हत्येची घटना उघड झाल्यावर पोलिसांनी दोन तासांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, घटनेच्या दिवशी आरोपीने रात्री पांढरा शर्ट घातला होता. तर सकाळी टी शर्टवर होता. याबाबत पोलिसांनी चौकशी केली. त्याचबरोबर पोशीर ते चिकनपाडा मार्गावर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी रात्रीच्या सुमारास जात-येत असताना दिसून आला. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीपुढे आरोपीने शरणागती पत्करत आपणच हे हत्यांकाड केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाय घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.