मुंबई : राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता आणखीन एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास ३ वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत. तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून, शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात नुकतीच शिक्षक भरती पार पडली. यात १४ हजार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांची नेमणूक देण्यात आली आहे. तर ५ हजार उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
या आधी तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे. परंतु
आता मात्र तीन वर्षांनंतर त्यांना नियमित
शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही.
तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे. अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.
शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन आग्रही आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध करणार
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकान्यांच्या बैठकीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही प्राथमिक चर्चा केली आहे.त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे परीक्षा परीषदेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.याआधी शिक्षण सेवकांना तीन वर्षांनंतर आपोआप कायम केले जायचे. परंतु, आता ही पद्धती बदलून परीक्षेचा निकष लावण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.यासंदर्भात काही दिवसांपूर्वी केसरकर यांनी शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, तसेच मंत्रालयातील सचिवांची संयुक्त बैठक घेतली. त्यात हे निर्देश दिले होते. त्यामुळे चार-चार परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणाऱ्या भावी शिक्षकांची आता आणखी एक अग्निपरीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच कायम नोकरीस ठेवण्यात येणार आहे. उर्वरित उमेदवारांना नोकरीतून डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात