बाल न्यायमंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात पाठवलेल्या मुलीला तू लेस्बियन आहेस म्हणत अश्लील चाळे करायला लावणाऱ्या संस्थेतील अधिपरिचारिकेवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी शहरातील उपनगरात असलेल्या निरीक्षणगृहात दाखल झालेल्या मुलींवर अधिपरिचारिकेकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चार महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे केली.
त्यानुसार त्यांनी लागलीच एक समिती स्थापन केली. समितीमध्ये तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली. संस्थेत गेल्यानंतर एका १६ वर्षाच्या मुलीकडे त्यांनी चौकशी केली. तिने सांगितले मी २ जुलै रोजी बालकल्याण समितीच्या आदेशाने निरीक्षणगृहात आले आहे. संस्थेतील अधिपरिचारिका मला तू लेस्बियन आहे, तू इतर मुलींसोबत लैंगिक संबंध ठेव, असे म्हणून जबरदस्ती करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच तिच्याशी अश्लील चाळेही तिने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चौकशी समितीच्या निदर्शनास या सर्व बाबी आल्याने अधिपरिचारिकेच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा व भारतीय न्यायसंहितेचे कलम ७४, ७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मुंढवा पोलिस करत आहेत.