उमदी परिसरातील सुसलाद, बालगाव, हळ्ळी या गावात फिरणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमके ड्रोन कोण उडवतंय याचा ठावठिकाणा लागत नाही. पोलीस प्रशासनाकडे याबाबत काही माहिती नसल्याने चोरटेच चोरी करण्यासाठी हायटेक यंत्रणेचा वापर करत आहेत काय ? अशी चर्चा सध्या सुरू आहे. तरी ड्रोन कोण उडवतंय याची चौकशी करून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.परिसरातील गावागावात ड्रोन कोण उडवतंय? याचा एकच गाजावाजा सुरू आहे.
याविषयी पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली असता अशी कोणतीही मोहीम नसल्याचे सांगितले जात आहे. मग नेमकी ड्रोनद्वारे गावावर नजर का ठेवली जात आहे. या विषयी चर्चा आहे. लोकांच्यात संभ्रमावस्थेसह भीतीचे वातावरण आहे. चोरीच्या घटना वाढल्यामुळे गस्त घातली जात आहे. ही गस्त रात्री गावात सुरू असताना ड्रोन कॅमेऱ्यावरुन गावचा आढावा घेऊन चोरी करण्याचे तंत्र शोधले आहे की काय ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात उडणारे ड्रोन कॅमेरे प्रशासनाचे नाही तर कोणाचे आहेत, याची माहिती पोलीस प्रशासनालाही नसल्याने ड्रोनचे कोडे उलगडलेले नाही.
संशयित व्यक्ती सापडल्यास पोलिसाशी संपर्क साधा
ड्रोन कॅमेरे दिसत असल्याचे दूरध्वनीवरुन पोलीस प्रशासनास सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोणतेही ड्रोन सोडले जात नाहीत. तरी अशा प्रकारचे ड्रोन कोण सोडतेय, त्याची चौकशी करण्याचे काम सुरू आहे, असा कोणी संशयित व्यक्ती सापडल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी केले आहे.