विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) उघडकीस आली. रामदास रावसाहेब नंदेवाड (२८), रा. ताडी हिरापूर असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रीनिवास बापूराव घंटेवाड (३०), रा. भोलापठार व मृतकाची पत्नी रेणुका रामदास नंदेवाड (२८), रा. ताडी हिरापूर या दोघांना अटक केली आहे.
५ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता शेणगावला जातो, असे सांगून रामदास नंदेवाड घरून गेला. त्यानंतर घरी आलाच नसल्याची तक्रार रेणुका रामदास नंदेवाड हिने ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता जिवती पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये श्रीनिवास बापूराव घंटेवाड (३०), रा. भोलापठार व मृतकाची पत्नी रेणुका रामदास नंदेवाड (२८) यांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हत्येच्या दिवशी मृतक रामदास नंदेवाड याला श्रीनिवासने गडचांदूर येथील देशी दारू दुकानातून दारू घेऊन काळया पिवळ्या रंगाच्या ऑटो रिक्षा क्रमांक टीएस २० टी ७१९६ मध्ये बसवून राजुरा रोडवर नेले. त्यानंतर ऑटो रिक्षात दारू पाजून राजुरा येथील वर्धा नदीच्या पुलावर रामदासच्या डोक्यावर दगडाने वार केला. त्यानंतर नदीमध्ये त्याला फेकून दिले. तो दगडही वर्धा नदीमध्ये फेकून दिल्याचे चौकशीत पोलिसांना कळले. त्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८, १४०(१), ६१ (२), ३ (५) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृतक रामदास याचा मृतदेह अद्याप सापडला नसून पोलिस त्याच्या मृतदेहाची चौकशी करीत आहे.
प्रेमप्रकरणाची कुणकुण
रामदास नंदेवाड यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. हाच धागा पकडून पोलिसांनी चौकशी केली.