सासवडच्या कर्तृत्वसंपन्न माळी समाजातील मंडळींनी १९३२ साली सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे कारखाना उभारला. “हाती घेऊ ते तडीस नेऊ” हा निर्धार असणाऱ्या असामान्य कर्तृत्वाच्या “युगंधरांचा” प्रदेश म्हणून सासवड ची ओळख महाराष्ट्राला सार्थ करून दाखवली आहे. धारणा, जिद्द चिकाटी, आणि आत्मविश्वास या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आव्हानाचा मुकाबला करीत आपले ध्येय त्यांनी साध्य केले आहे. असाध्य ते साध्य असा त्यांचा प्रवास पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. पारतंत्र्याच्या काळात १८९५ च्या दरम्यानच्या काळात सासवड गावाच्या एकूण लोकसंख्येत माळी समाजाची लोकसंख्या निम्मी होती. सिंचनाच्या अपुऱ्या सोई, प्रतिकूल वातावरण यामुळे सतत पाण्याच्या शोधात त्यांनी शेतीसाठी भटकंती केल्याचा इतिहास आहे. बागायती शेती करण्यासाठी पाण्याची उपलब्धता होईल तेथे आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात त्यांनी धन्यता मानली. बारामती परिसरात खंडाने जमिनी घेऊन ऊस लागवडी केल्या आणि यशस्वी केल्या. १८९७-९८ च्या सुमारास शेटफळ तलावावर ऊस शेतीला प्रारंभ केला. पुन्हा दुष्काळ पडला, पुन्हा पाण्याची आणि शेतीची शोध यात्रा चालू झाली. त्यातून कोपरगाव, बेलापूर बारामती बावडा अकलूज आणि माळीनगर पर्यंत प्रवास झाला. या प्रवासात त्यांनी जिथे जिथे पावलं ठेवली तेथे तेथे आपल्या कष्टाच्या जोरावर चैतन्याचे मळे फुलवले. अनेक ठिकाणी विखुरलेल्या समाजाला एकत्र करून विकासाच्या नव्या पर्वाला सुरवात करायला पाहिजे याची जाणीव समाजातील काही दृष्ट्या लोकांना झाली.
संघटनेशिवाय विकास साधता येणार नाही. हीच त्यांची धारणा होती. या विचारातून प्रेरित होऊन हणमंतराव गिरमे यांनी पुढाकार घेऊन सासवड येथे एक बैठक बोलावली, पण बैठकीस प्रतिसाद मिळाला नाही. निराश न होता, उमेद न हारता याचा पाठपुरावा केला. एका लग्न समारंभास जमलेल्या ठिकाणीच त्यांनी संगठनाची गरज असलेली भूमिका मांडली सर्वानी संकल्पनेचे स्वागत केले. “सासवड माळी सभा” या नावाची संस्था स्थापन झाली साखर कारखान्याच्या निर्मितीचे बीज खऱ्या अर्थाने या संघटन संस्थेच्या रूपाने रुजली होती. १९०७ साली माळीसभा उत्तम स्थितीत आली याकामी गोविंदराव तुकाराम गिरमे, बळवंतराव धर्माजी गिरमे या मंडळींनी खूप परिश्रम घेतले. कोपरगाव येथेही माळी सभेची शाखा काढण्यात आली. खंडाने जमिनी घायच्या ऊस पिकवायचा गुळाची निर्मिती करायची यात जम बसला. पण हरिभाऊ गिरमे, रावबहादूर नारायणराव बोरावके, मारुतीराव पांढरे, भगवंतराव गिरमे, सोपानराव इनामके याना काहीतरी वेगळे केले पाहिजे भविष्याचा वेध घेऊन पुढचे पाऊल टाकले पाहिजे हाच विचार मनात घोळत होता. समाजाची व आपली प्रगती करावयाची असेल तर चाकोरी बाहेर पडले पाहिजे हि जाणीव झाली. गुळाचे पडणारे दर पाहून साखर निर्मितीकडे वळले पाहिजे हा विचार दृढ झाला.
चार चौघांनी एकत्र येउन साखर कारखाना सुरु करायचा हि गोष्ट वाटते इतकी सोपी न्हवती. पण पक्का निर्धार, प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आव्हानांचे सर्व डोंगर पार करायची उमेद निर्माण झाली. कंपनी रजिस्टर करणे, हिशोब समजावून घेणे यासाठी किर्लोस्कर आणि वेलणकर मिलला भेटी दिल्या. १९३१ साली हरिभाऊ गिरमे,नानासाहेब पांढरे, गणपतराव रासकर, रावबहादूर नारायणराव बोरावके, भगवंतराव गिरमे, बापूराव बोरावके आदी १४ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यांची आखणी केली.
बिहारमधील बक्सरचा कारखाना, उत्तर प्रदेशातील पाचुरकी आणि लखनौ परिसरातील कारखान्याची पाहणी केली. कानपूरच्या गुळापासून साखर साखर तयार करणारा कारखानाही त्यांनी पहिला. शंकांचे समाधान करून कारखाना उभा करायचाच अशी खूणगाठ बांधूनच सर्वजण परतले. पारतंत्र्य !अवघड काळ अर्थसहाय्य, तज्ञांचा वानवा, मार्गदर्शन नाही, भांडवल अपुरे, शिक्षण कमी, पैसा, कायदा घटना, नियम जमिनी, मशीनरी मोठे आव्हान होते.
१९३१ साली कोपरगावजवळील बेटावर संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीला जमलेल्या लोकांच्या साक्षीने १७ जणांचे नियामक मंडळ तयार करून कामाची सुरवात झाली. ९ नोव्हेम्बर १९३२ ला दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. या कारखान्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली. साखर कारखाना उभारताना सहकाराचे तत्व आचरणात आणायचे ठरवले होते. परंतु त्या काळी कायद्यात तरतूद नसल्याने हा विचार सोडून द्यावा लागला. साखर कारखान्याची निर्मिती करण्यासाठी जागेचा शोध सुरु झाला.
अकलूजच्या रायचंद भाईचंद व्होरा यांनी खूप मदत केली. परिसरात जमिनीची पाहणी सुरु झाली. हरिभाऊ गिरमे, शंकरराव राऊत, भगवंतराव गिरमे, सोपानराव गिरमे, नानासाहेब पांढरे, गणपतराव रासकर, बापूराव बोरावके या मंडळींनी लोकांना भेटून साखर कारखान्याचा मनोदय सांगितला. लोकांनी फारसा पाठिंबा दिला नाही, पण ते निराश झाले नाहीत. एके दिवशी एक शुभशकुन घडला. “तांबवे” परिसरात फिरताना भर दुपारी सूर्य ढगाआड गेला. काळे निळे ढग जमा झाले आणि पाऊस सुरु झाला. हाच शुभशकुन मानून याच ठिकाणी कारखाना उभारायचा हे निश्चित केले. गणपतराव रासकर, सोपानराव गिरमे, भाऊसाहेब राऊत, यांची एक समिती स्थापन करून अकलूज येथे एक ऑफिस उघडण्यात आले. ऑफिस म्हणजे काय? तर एक घोंगडी, लिखाणाचे सामान बस्स …..
रोज लोकांना भेटायचे, जमिनी खंडाने मिळवायच्या, हे काम त्यांनी ना दमता ना थकता केले. रायचंद भाईचंद यांनी आपली ४० एकर जमीन साखर कारखान्यासाठी दिली. जमीन जशी मिळेल तशी मेहनतीची कामे हाती घेतली. दूरवर पसरलेल्या ओसाड रानात वाढलेली झाडे, खाज खळगे, आणि ओढ्या नाल्यांच्या घळी सर्वत्र होत्या, दगड अस्ताव्यस्त पडलेले हे सगळे बाजूला करून जमिनी लागवडीखाली आणली. जमीन पिकाऊ करण्यासाठी जीवाचे रान केले. जमिनी नांगरून तयार केल्या . या परिसरात बेणे नसल्याने ई .के. जातीचे बेणे कोपरगाव, बेलापूर, येथून बेणे आणण्याचे ठरवले. बेणे इथपर्यंत कसे आणायचे? हा मोठा प्रश्न होता. रेल्वेने भिगवण, कुर्डुवाडी येथे बेणे आणायचे व तेथून बैलगाडीने आणायचे असा पर्याय निवडला. रेल्वे स्टेशनवर बेणे सुकू नये म्हणून सारखे पाणी मारत मारत बेणे आणावे लागले. इकडे हरिभाऊ गिरमे, नारायण बोरावके, नानासाहेब पांढरे हि मंडळी कारखाना उभा करण्यासाठी पैसा जमाकरीत होती. पैसा जमा करण्यासाठी त्यांनी जमीन, दागिने, गुरे, ढोरे सर्व -सर्व विकले. तरीही ५० हजारच रुपये जमले. त्या काळी त्यांना ४ लाख रुपये लागत होते. उरलेल्या पैशांचे करायचे काय ? हा प्रश्न होता, इंग्लंड च्या फॉसेट प्रेस्टन कंपनीला १९३३ मध्ये ऑर्डर देण्यात आली. लिव्हरपूल कंपनी कडे कारखान्याची जमीन सर्व गहाण ठेवावी लागली. २ फेब्रुवारी १९३४ मध्ये गहाणखत करार झाला.
मशीनरी इंग्लंड वरून जहाजाने भारतात आली व तेथून कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आली. पण साईट वर मशीनरी न्यायाची हा मोठ प्रश्न होता. कारण दळण वळणाची साधने न्हवती. रस्ते न्हवते, नीरा-भीमा नदीवर पूल न्हवते. वाहन व्यवस्था न्हवती मनुष्यबळ न्हवते. तरीही प्रतिकूल परिस्थितीत साईटवर मशीनरी आली. एका निर्जन ठिकाणी मशीनरी आल्या. निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी एखादे झाड हटकून लावावे व त्यावर पक्षांची किलबिल सुरु व्हावी त्याप्रमाणे तेथे माणसांची वर्दळ सुरु झाली. त्या वेळी संस्थापकांच्या स्वप्नांना आकार येउ लागला. अडचणींना सामोरे जात रात्रीचा दिवस करून कामाचा अखेर शीण गेला. कारखाना विश्वश्वरय्या या जागविख्यात वस्तू विशारदाच्या मदतीने उभा राहिला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला पहिला कारखाना, नव निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून सासवड मधून निघालेल्या शेतकऱ्यांनी कारखाना उभा केला . १९३४ -३५ या गळीत हंगामात पहिला हंगाम घेतला.
माळी बांधवानी चैतन्यशाली, स्वप्नशील, अविरत, अविश्रांत घेतलेल्या कष्टातून उभारलेला हा कारखाना अकलूज परिसरासाठी वरदान ठरला. विजयादशमीचा तो दिवस होता. विजयादशमीच्या दिवशी आपट्याला सोने संबोधून आपट्याची पाने देण्याची प्रथा आहे सोने लुटायचा या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणाऱ्या या उद्योगाचा प्रारंभ होता. या दिवशी गव्हाणीत मोळी टाकून कारखाना सुरु करण्याचा संस्थापकांना झालेला आनंद अवर्णनीय होता. जे स्वप्न पहिले ते स्वप्न सत्यात होते. तेंव्हा सोसलेल्या हालअपेष्टा यातना कष्टाची फुले झाली. या कारखान्याने राज्याला एक आशेचा किरण दाखवला सहकाराला दिशा दिली.
१९५९ या रौप्य महोत्सवी वर्षात यशवंतराव चव्हाणाचे जंगी स्वागत संचालकांनी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर केले. हरिभाऊ बळवंतराव गिरमे मॅनेजींग डायरेक्टर व मारुती खंडूजी पांढरे चेअरमन होते. या कार्यक्रमाच्या वेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले “महाराष्ट्रातील पहिला मानाचा सहकारी साखर कारखाना असा उल्लेख करून सामान्य कुटुंबातील पण असामान्य कर्तृत्वाच्या माळी समाजातील व्यक्तींनी केलेल्या या कार्याला मनाचा मुजरा करायला हवा. “सासवडच्या कर्तृत्वसंपन्न माळी समाजातील मंडळींनी १९३२ साली सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे कारखाना उभारला.” हाती घेऊ ते तडीस नेऊ” हा निर्धार असणाऱ्या असामान्य कर्तृत्वाच्या “युगंधरांचा” प्रदेश म्हणून सासवड ची ओळख महाराष्ट्राला सार्थ करून दाखवली आहे. धारणा, जिद्द चिकाटी, आणि आत्मविश्वास या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आव्हानाचा मुकाबला करीत आपले ध्येय त्यांनी साध्य केले आहे. असाध्य ते साध्य असा त्यांचा प्रवास पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
विजयादशमीचा तो दिवस होता .. विजयादशमीच्या दिवशी आपट्याला सोने संबोधून आपट्याची पाने देण्याची प्रथा आहे सोने लुटायचा या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणाऱ्या या उद्योगाचा प्रारंभ होता. या दिवशी गव्हाणीत मोळी टाकून कारखाना सुरु करण्याचा संस्थापकांना झालेला आनंद अवर्णनीय होता. जे स्वप्न पहिले ते स्वप्न सत्यात होते . तेंव्हा सोसलेल्या हालअपेष्टा यातना कष्टाची फुले झाली . या कारखान्याने राज्याला एक आशेचा किरण दाखवला सहकाराला दिशा दिली. १९५९ या रौप्य महोत्सवी वर्षात यशवंतराव चव्हाणाचे जंगी स्वागत संचालकांनी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर केले.हरिभाऊ बळवंतराव गिरमे मॅनेजींग डायरेक्टर व मारुती खंडूजी पांढरे चेअरमन होते. या कार्यक्रमाच्या वेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले “महाराष्ट्रातील पहिला मानाचा सहकारी साखर कारखाना असा उल्लेख करून सामान्य कुटुंबातील पण असामान्य कर्तृत्वाच्या माळी समाजातील व्यक्तींनी केलेल्या या कार्याला मनाचा मुजरा करायला हवा.”