ओळखीच्या घरात शिरून एका नराधमाने दिवसाढवळ्या एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पारडी परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. ती उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पीडित मुलीचे आई-वडील मजुरी करतात. तिला एक चार वर्षांची बहीण आहे. रविवारी सकाळीच आई-वडील कामासाठी बाहेर गेले होते. दोन बहिणी घरात असताना दुपारी ३:३० वाजता दुचाकीवर एक आरोपी आला. त्याने ८ वर्षीय मुलीला वडिलांचे नाव घेऊन ते कुठे गेले, अशी विचारणा केली. त्यानंतर मुलगी घरात एकटीच असल्याचे लक्षात आल्याने या नराधमाने ओळखीच्या काही लोकांची नावे घेत मुलीला विश्वासात घेतले. छोट्या मुलीला बाजूला बसण्याचे सांगून आरोपी पीडित मुलीला आत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.
बालिका वेदनेने विव्हळत असताना त्या नराधमाने तिला खाऊ घेण्यासाठी २० रुपये दिले आणि पळून गेला. काही वेळेनंतर आई-वडील घरी परतले असता बालिकेने आपबिती सांगितली. त्याची मोहल्ल्यात माहिती होताच परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.पीडित बालिकेसह पालकांनी पारडी ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
घटनेच्या वेळी बाजूलाच राहणारी मुलीची आत्या आणि तिचे कुटुंबीय घरी होते. मात्र, त्यांना पोलिसांनी विचारणा केली असता या घटनेबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. परिसरातील नागरिक आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस त्या नराधमाचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, दिवसांपूर्वीच काही बदलापूरमध्ये बालिकांच्या शोषणाच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता पारडीत ही घटना उघडकीस आल्याने परिसरात संताप निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीही अल्पवयीन
तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय विधी संघर्ष मुलाने घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना, रविवारी उघडकीस आली. दुपारी घरात घुसून अत्याचार करणाऱ्या व ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विधी संघर्ष मुलाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.