ऊसतोड मजुरांचे खैराव बनतेय सरकारी नोकरदारांचे गाव | पती-पत्नीसह पाच जण एकाचवेळी शासकीय सेवेत रुजू

0
13

जत : तालुक्यातील खैराव गाव ऊसतोड मजुरांचे गाव, शेतमजुरांचे गाव म्हणून ओळखले जात होते. २० एकराहून अधिक शेती असलेला शेतकरीही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला जायचा. पण मागील पाच वर्षात ऊसतोड मजुरांचे खैराव हे गाव तालुक्यात सरकारी नोकरदारांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. जिद्द, कष्ट, अपार मेहनतच्या जोरावर गावातील तरुणांनी गावाचे नाव तालुक्यातच नव्हे तर, राज्याच्या नकाशात झळकावले आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात ओएसडी दत्तात्रय सांगोलकर नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सुखदेव येडवे, मुंबई महानगर पालिकेच्या उपायुक्त स्वप्नजा क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोणे, प्रकाश गोरड, आयआयटीमध्ये सेवा बजावत असलेले ओंकार व सौरभ गडदे हे दोघे बंधू व खैरावमधील अनेक तरुण शासकीय, निमशासकीय सेवेत सेवा बजावत आहेत. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत खैरावमधील तरुणांनी बाजी मारली आहे. पती, पत्नी रोघेही एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू झाले.

कुमार सांगोलकर यांची एम.एस.एफ, मुंबई येथे तर, त्यांची पत्नी पुष्पा सांगोलकर यांची ठाणे पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. म्हाळाप्पा येडचे ठाणे शहर पोलीस ठाण्यात, सुनिता क्षीरसागर यांची आरोग्य सेविका जिल्हा परिषद, सांगली तर, मिरज येथील मिशन हॉस्पिटल येथे स्वप्ना जिपटे यांची परिचारिका म्हणून निवड झाली.

या सर्वांचा तसेच धावपटू धनाजी येडवे यांचा सत्कार सौराव ग्रामस्थांच्यावतीने पार पडला. यावेळी सरपंच इंदाबाई गंगणे, सामजिक कार्यकर्ते गोविय वाणी, विजय रुपनुर, ग्रामपंचायत सदस्य मंगल जिपटे, भानुदास क्षीरसागर, धोंडीबा सांगोलकर, करण शेळके, नवनाथ चौगुले, ग्रामसेवक रवींद्र कोळी आदी उपस्थित होते.

अनोख्या सत्काराने डोळे पाणावले
सत्कार म्हटलं की सत्कार मूर्तीचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार होतो, पण सैराव येथील सत्कार सोहळ्याने अनेकांचे डोळे पाणावले, शासकीय सेवेत निवड झालेल्या सत्कारमूर्तीचा सत्कार झाल्यानंतर सत्कारमूर्तीनी ज्याच्यामुळे आपण घडलो त्या आई, वडील, गुरुजन व नातेवाईक यांना व्यासपीठावर बोलावून घेत गळ्यातील हार त्यांच्या गळ्यात घालत, त्यांच्या पाया पडत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर भावूक वातावरण तयार झाले. मुलांनी व आई-वडिलांनी आपल्या अश्रुला वाट मोकळी करून दिली, शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर गोरगरिबांची सेवा करा, असे भावनिक आवाहनही यावेळी नातेवाईकांनी केले. यावेळी सत्कार मूर्तीच्याहस्ते घरकुलांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here