अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला. त्यानंतर पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलीचा पती, सासू, आई, वडील यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ व बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी व तिचा पती यांची ओळख होती. यातून या अल्पवयीन मुलीचा नेर्ले (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील डोंगरावर असलेल्या साताईदेवी मंदिरात नोव्हेंबर २०२३ मध्ये बाल विवाह लावून देण्यात आला. बालविवाहानंतर पीडित अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित मुलगी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांना तिच्या जन्मतारखेवरून ती अल्पवयीन असल्याचे समजले.
यावरून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी शिराळा पोलिस ठाण्यास ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी तेथे येऊन माहिती घेतली. पीडित मुलीची पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेतली. पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही तिचे लग्न लावून दिले. तसेच सासरी नांदत असताना या अल्पवयीन पीडित मुलीबरोबर पतीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. यावरून पीडित मुलीचा पती, सासू, आई, वडील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.