मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू | कसा आहे पुढच्या आठवड्याचा हवामान अंदाज,वाचा सविस्तर

0
7
मान्सून सोमवारपासून (दि. २३) पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. यंदा तो नेहमीपेक्षा चार दिवस उशिरा निघत आहे, अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे. दरम्यान, राज्यात २५ सप्टेंबरदरम्यान मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा मान्सून लांबणार की वेळेवर परतीच्या प्रवासाला निघणार, अशी मतमतांतरे शास्त्रज्ञांमध्ये होती. कारण, उत्तर भारतासह राजस्थानात तशी स्थिती दिसत नव्हती. दरवर्षी पूर्व किंवा पश्चिम राजस्थानातून मान्सून परतीला निघतो. या वर्षी तो २३ सप्टेंबर म्हणजे चार दिवस उशिरा परतीच्या प्रवासाला निघत आहे. तशी स्थिती पश्चिम राजस्थानात दिसून आल्याने हवामान विभागाने ही घोषणा केली.
स्थिती अनुकूल
पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनला माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. तसेच कच्छमध्येही तशीच स्थिती दिसून आल्याने २३ सप्टेंबरपासून मान्सून या दोन्ही भागांतून परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज आहे

हजारी गाठण्याची शक्यता
गेल्या वर्षी प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने ओढ दिली होती. जून, जुलै आणि ऑगस्ट तिन्ही महिने पाऊस महिन्याची सरासरीदेखील गाठू शकला नाही. ऑगस्टमध्ये संपूर्ण महिनाभरात अवघा ४३ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा तिन्ही महिने सुखद गेले असून, ऑगस्टमध्ये दमदार पावसाने बाजी मारली आहे. पुण्यात पावसाळी हंगामात आतापर्यंत ९२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्यास अनेक वर्षांनी पुण्यातील पावसाळी हंगामातील एकूण पाऊस हजार मिलिमीटरपेक्षा अधिक होण्याची चिन्हे आहेत.

बुधवारपर्यंत राज्यात विखुरलेला पाऊस
बंगालच्या उपसागरात झालेल्या स्थितीमुळे २५ सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. मात्र, तो विखुरलेल्या अवस्थेत असेल. सर्वत्र सारखा पडणार नाही. प्रामुख्याने २४ आणि २५ रोजी मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भ या भागातही २५ व २६ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी
हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे यंदाच्या ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये दहा वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पावसाळी हंगामात सलग तिसऱ्या महिन्यात पुणे शहरात सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात शहरात २७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथा, जिल्हा आणि धरणक्षेत्रांतही समाधानकारक पाऊस पडल्याने धरणेही पूर्ण क्षमतेने भरली. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली असली, तरी यंदाचा हंगाम चांगला असेल. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, असे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मे महिन्याच्या अखेरीस दिले होते. यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here