माडग्याळच्या बाजरीचा राज्यात डंका | राज्यपालांकडून गौरव ; पांडुरंग सावंत यांचा राज्यात प्रथम क्रमांक

0
25
महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात माडग्याळ (ता. जत) चे पांडुरंग सावंत यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा व कुटुंबीयांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन मुंबई येथे सन्मान करण्यात आला.
पूर्व भागातील माडग्याळ येथे २०२२ मध्ये बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेऊन कृषी विभागाने खरीप बाजरी अभियान राबवले. हा भाग कोरडवाहू, मध्यम व हलक्या प्रतीची जमीन असलेला आहे. खरिपात प्रमुख पीक म्हणून बाजरीची पेरणी केली जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बाजरी उत्पादन वाढीसाठी जतचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप बाजरीचा प्रयोग हाती घेण्यात आला.
३० शेतकऱ्यांचा समता शेतकरी गट स्थापन करून ‘एक गाव एक वाण’ याअंतर्गत खरीप हंगामामध्ये २५ एकर क्षेत्रावर बाजरीची पेरणी करण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगामध्ये विठ्ठल ईश्वर सावंत यांचे पुत्र पांडुरंग सावंत यांनी एकरात ४३ क्विंटल उत्पादन घेतले. हे उत्पादन देशपातळीवर उच्चांकी असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले. त्यांनी सर्वसाधारण गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल सावंत कुटुंबियांचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, सचिव जयश्रीताई भोज, संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक विकास पाटील आदींची उपस्थिती होती.
गावात जलसंधारणाची अनेक कामे
पांडुरंग सावंत यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पारिसरात लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावणे यासारखे जलसंधारणाची अनेक कामे केली आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ते सहभागी असतात.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here