अक्कलकुवा : तालुक्यातील सरी गावाच्या शिवारातील घाटात महिलेचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसला होता. तर मुलाचा मृतदेह नदीत आढळल्याने मोलगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, महिलेच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशन गाठले होते. माहेरच्यांनी वारंवार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर ४० दिवसानंतर मोलगी पोलिसांत सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा टेंबरीगव्हाणपाडा येथे राहणाऱ्या तिज्या इंद्या वसावे यांची मुलगी मोगीबाई चंदु पाडवी हीचे १२ वर्षांपुर्वी साकलीउमरचा लोहारपाडा ता. अक्कलकुवा येथील चंदू धन्या पाडवी याच्याशी लग्न झाले होते. चंदू पाडवी व मोगीबाई पाडवी यांना ५ वर्षांचा तनुष नावाचा मुलगा होता.
तिज्या वसावे हे कुटुंबासमवेत शेतात काम करत असताना १३ ऑगस्ट रोजी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा जावयाने सांगितले की, मी नैसर्गिक विधीला सरी गावाच्या शिवारातील घाटात गेलो असता मला माझी पत्नी मोगी ही एका झाडाच्या फांदीस मृत अवस्थेत लटकलेली दिसून आली. मात्र, मुलगा घरात अथवा महिलेजवळ आढळून आला नाही. अशी माहिती सांगितल्या नंतर तिज्या वसावे यांनी गावातील पोलीस पाटील तसेच नातेवाईकांना सोबत घेऊन जावयाने सांगितलेल्या ठिकाणी तपास करण्यासाठी निघाले. ही बाब पोलीस पाटील यांनी पोलिसांनाही कळवले. मात्र, रात्र झाल्याने काही दिसून आले नाही. त्यामुळे सर्व परत आले. १४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सुमारास पुन्हा सर्वजण त्या ठिकाणी गेले असता मोगी चंद् पाडवी (वय ३३) हीचा मृतदेह झाडाच्या फांदीस ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आणि तनुष चंदु पाडवी (वय ५) हा सदर
ठिकाणाहून सुमारे ५०० मिटर अंतरावर नदीचे पात्राच्या पाण्यात मृत अवस्थेत दिसला आहे.पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे मृतदेह नेण्यात आले. मात्र, मृत महिलेल्या माहेरच्या मंडळींनी तिने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी मोलगी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.
अखेर आई व बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या
मंडळींच्या ताब्यात देण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची मागणी
मोगी चंदू पाडवी आणि बालक तनुष चंदु पाडवी यांच्या मृत्यूनंतर सदर महिलेने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय मृत महिलेच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात पाठपुरावा केला. मात्र, अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मोलगी पोलीस ठाण्यात सदर महिला व बालकाच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
41 दिवसानंतर गुन्हा दाखल
अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर येथील मोगीबाई चंदू पाडवी या मयत विवाहितेचे पतीसह सासरच्या मंडळींकडून शारीरीक आणि मानसिक त्रास देण्यात येत होता. तसेच, या संशयीतातील एकाकडून विनयभंग करण्याचा प्रयनही होत होता. ही बाब विवाहितेने आपल्या पतीसह सासरच्या लोकांनाही सांगितली. परंतू त्यांनी उलट विवाहितेला त्रास दिला. अखेर या त्रासाला कंटाळून मोगीबाई चंदू पाडवीने पाच वर्षीय बालक तनुष पाडवी याच्यासोबत आत्महत्या केली आहे.
याबाबत मयत विवाहितेचे वडील तिज्या इंद्या वसावे यांच्या फिर्यादीवरून ४१ दिवसानंतर २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेला मोलगी पोलिस ठाण्यात पती चंदू धन्या पाडवी, सासरा धन्या उन्या पाडवी, सासू ललीता धन्या पाडवी, बोंडा दिवाल्या पाडवी या चौघांविरुद्ध भा.न्या.स.चे कलम १०८, ८५. ७४, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.