रस्त्यावर वाहन अडवून तब्बल दोन कोटी ४१ लाख रुपयांची लूट करणाऱ्या सहा जणांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती.
या खटल्याची हकीकत अशी, १२ ऑक्टोबर २०१८ रोजी गुजरातमधील वाहनचालक शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल हे अहमदाबाद यांना तेथील व्यावसायिक यांनी जळगाव येथील कार्यालयातून काही रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार चालक पटेल हे व त्यांच्या सोबती असे जळगाव येथील कार्यालयात पोहोचले.तेथून त्यांनी दोन कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या ताब्यात घेऊन चारचाकी वाहनाने ते पुन्हा अहमदाबादकडे रवाना झाले. अहमदाबादकडे जात असताना नवापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर त्यांच्यामागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करून आडवे लावले. त्यांना बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दोन कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी नवापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांना झाली शिक्षा…
■ दीपककुमार हसमुख पटेल, अमरसिंग चेनाजी ठाकोर, अक्षयकुमार शैलेशभाई पटेल, राजेश कांजीभाई पटेल, प्रकाशकुमार शांतीलाल पटेल, मेघराज ऊर्फ मेहूल अमर ताजी राजपूत (सर्व रा. गुजरात) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता टी. डी. कापडिया यांनी सर्व साक्षी-पुरावे न्यायालयासमोर सादर केले.