कोसारी (ता. जत) येथे घराच्या बांधकामासाठी आणलेले २२ हजार ३०० रुपयांचे साहित्य तसेच न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला ८०० किलो पोषण आहाराचा तांदूळ चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याजवळील गुन्ह्यातील ६६ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, चोरट्याने ८०० किलो तांदूळ लंपास केल्याची फिर्याद मुख्याध्यापक भीमसेन नागणे यांनी दिली होती. तर बांधकाम साहित्य चोरीस गेल्याची ही फिर्याद दाखल होती. या दोन्ही चोरीचा तपास लावण्यात जत पोलिसांना यश आले आहे.
जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक अर्जुन घोदे, विनोद सकटे, श्रीनाथ एकशिंगे, सागर कारंडे यांना वाढत्या चोरी व घरफोडी च्या अनुषंगाने रेकॉर्डवरील इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे कामी सुचना दिल्या.
त्यानुसार पेट्रोलींग करताना पोलीस कॉस्टेबल विनोद सकटे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की एक इसम बिरनाळ हद्दीतील एडके यांच्या शेतात पड़क्या खणीजवळ बंद पडक्या खोली परिसरात संशयितरीत्या घुटमळत आहे. पोलिसांनी त्यास ताव्यात घेतले असता तो अल्पवयीन निघाला. त्याने वडिलांसमक्ष व पंचासमक्ष चोरी केल्याची कबुली दिली. मुद्देमाल बंद पत्र्याच्या खोलीमध्ये ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.