सांगली : वनरक्षक हे वन विभागाचा चेहरा आहेत. वनरक्षकांनी चांगले काम करून वन विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न करावा. प्रशिक्षण कालावधीत जसा फिटनेस राखला तसाच फिटनेस आयुष्यभर राखावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण यांनी व्यक्त केली.
कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षक पायाभूत पाठ्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या दीक्षांत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रशिक्षण सत्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली व धुळे या वनवृत्तांतील एकूण 108 प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले. यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम, कुंडल वन प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे, सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक किरण जगताप, प्रबोधिनीतील सहायक वनसंरक्षक कल्याणी यादव, बाळकृष्ण हसबनीस, निवृत्त उपवनसंरक्षक माणिक भोसले, निवृत्त विभागीय वन अधिकारी दिलीप भुर्के, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, सुखदेव खोत, दत्तात्रय शेटे आदी उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व वनरक्षक प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. जीवनात शिस्त सर्वात महत्वाची आहे. वनरक्षक वने, नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षणकर्ते असून, त्यांच्या हाती जंगल, जमिनीचे, जैवविविधतेचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. जंगल उभं राहण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, त्याचे रक्षण करा. नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेऊन, तक्रार न करता प्रामाणिकपणे काम करत राहा. अडचणीतून मार्ग काढा. एखाद्या विषयात प्राविण्य प्राप्त करा. वन हे मुक्त विद्यापीठ असून त्याचा फायदा घ्या. निसर्गाकडून सतत शिकत राहा, रोज खेळ, व्यायामाचे माध्यमातून स्वत:ला तंदुरुस्त ठेवा असे ते म्हणाले.प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रबोधिनीमधून आजवर 42 हजार 749 अधिकारी – कर्मचारी यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कु. माधवी मदनसिंग परदेशी या महिला प्रशिक्षणार्थी यांनी 86.45 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. ‘सर्वोकृष्ट अष्टपैलू वनरक्षक’ हा सन्मानही त्यांनी प्राप्त केला. याशिवाय त्यांना २ रौप्यपदके मिळाली. रुकसाना शेख, बाळू राठोड, श्रद्धा भांगे यांनाही प्रत्येकी एक रौप्यपदक मिळाले. दत्ता सूर्यवंशी व रुकसाना शेख यांनी प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.प्रशिक्षणार्थीच्या पासिंग आऊट परेडचे शानदार संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले. त्यासाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. चैतन्य कांबळे यांनी निकाल वाचन केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे, प्रशिक्षण सत्राचे सत्र संचालक वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे व भरत लटपटे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक कल्याणी यादव यांनी तर आभार बाळकृष्ण हसबनीस यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्रशिक्षणार्थींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.