वायफळेच्या सर्कल वैशाली वाले यांच्या लाचखोरीमुळे ‘महसूल’ची प्रतिमा डागाळली : भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज

0
5

तासगाव : (अमोल पाटील)तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनात लाचखोरी बोकाळली आहे. कोतवालापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात लाचखोरीने बरबटलेले आहेत. गोरगरीब, सामान्य, कष्टकरी लोकांच्या नरडीला नख लावून महसूल प्रशासनाने स्वतःचे खिसे गरम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वायफळेच्या मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना 7 हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद करण्यात आले. वाले यांच्या या कारनाम्यामुळे तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या खात्याची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत साखळी असलेल्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

तासगाव महसूल प्रशासनाचा कारभार नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. येथील तहसील कार्यालयात आजपर्यंत लाचलुचपत विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत. शिवाय कोतवाल, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. महसूल विभागातील अनेकजण आजपर्यंत ‘लाचलुचपत’च्या गळाला लागूनही या विभागाच्या कारभारात सुधारणा होत नाही.

तासगाव तालुक्यात तलाठी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत भ्रष्टाचार फोफावला आहे. पैशासाठी सामान्य लोकांच्या कामाची अडवणूक केली जाते. कोणत्याही कागदावर आर्थिक वजन ठेवल्याशिवाय महसुलमधील कागद हलत नाही. सामान्य लोकांची अक्षरशः पिसं काढली जात आहेत. लाच दिली नाही तर संबंधित कामाला हातही लावला जात नाही, अशा तक्रारी आहेत.

प्रशासन मुजोर होत असताना लोकप्रतिनिधी व भावी आमदारांना सामान्य लोकांची होणारी ही पिळवणूक पहायला वेळ नाही. महसूल प्रशासनावर कोणाचाच वचक नसल्याने किरकोळ कामासाठीही लोकांची अडवणूक होत आहे. छोट्या – छोट्या कामासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. त्यातच तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नुकताच तासगावचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचं आणि प्रशासनाचं ‘ट्युनिंग’ अजून जुळलेलं दिसत नाही. परिणामी महसूलमधील लाचखोर आणि भिकारचोट कर्मचारी आपल्या अपरोक्ष नेमके काय दिवे लावतात, याचा अंदाज बहुतेक पाटोळे यांना अद्याप आलेला दिसत नाही.

तत्कालीन तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या बदलीनंतर महसूल प्रशासनातील काही दिवट्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या नागवण्याचा एककलमी कार्यक्रम काहींनी हातात घेतला आहे. भरमसाठ पगार असतानाही भीक लागल्यासारखे लाचेला चटावलेली ही मंडळी सामान्य लोकांच्या नरडीला नख लावत आहेत. शिवाय एजंटांनीही तासगाव तहसील कार्यालयाला गराडा घातल्याचे दिसत आहे. काही पांढरपेशे धेंडे सुपाऱ्या घेऊन लोकांची कामे करत आहेत. ही मंडळी लोकांची कामे करून देण्याचा नावाखाली सामान्यांना लुटत आहेत. शिवाय पांढऱ्या कपड्यात हप्ते गोळा करणारी टोळीही तहसील कार्यालयाच्या आवारात घिरट्या मारताना दिसत आहे. येरळा नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहत असलेल्या वाळू माफियांनीही कात टाकल्याचे दिसत आहे.

नूतन तहसीलदार अतुल पाटोळे यांना लाचखोरीला सोकावलेल्या प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांना वेसण घालण्याचे व सामान्य लोकांची कामे वेळेत करून देण्याचे ‘शिवधनुष्य’ पेलावे लागणार आहे. कारण पाटोळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महसूल प्रशासनाचा कारभार कासावगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. पाटोळे यांचे व प्रशासनाचे सूत अजून जुळल्याचे दिसत नाही. कदाचित सामान्य लोकांच्या कामातील दिरंगाई का त्याचाच परिपाक असावा.

दरम्यान, महसूल प्रशासनाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना वायफळेच्या सर्कल वैशाली प्रवीण वाले यांनी 7 हजार रुपयांची लाच घेऊन प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. वाले यांच्या या पराक्रमामुळे महसुलच्या अब्रूचे खोबरे झाले आहे. तासगावच्या महसूल प्रशासनाची जिल्ह्यात अक्षरशः छि – ठू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचे आव्हान नूतन तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यासमोर असणार आहे.

वैशाली वाले यांनी वायफळे सर्कलचा पदभार स्वीकारल्यापासून त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या नोंदीसाठी त्याचे रेटकार्ड ठरले होते. पैसे दिल्याशिवाय नोंदी केल्या जात नव्हत्या. अगदी सध्या, सरळ, नियमातील नोंदीसाठीही 3 ते 5 हजार रुपये घेतले जात होते. अर्जंट नोंदीसाठी 5 ते 10 हजार रुपये, अडचणीतील व लिटीगेशनमधील नोंदीसाठी 10 ते 15 हजार असे रेट ठरले होते. बस्तवडेचा झिरो तलाठी राहुल बाबर व वायफळेचा कोतवाल प्रदिप माने याच्या माध्यमातून त्यांचा हा सौदा सुरू असायचा.

वैशाली वाले यांच्या या लाचखोरीला सामान्य लोक वैतागले होते. मात्र कोणीही तक्रार करायला धजावत नव्हते. अखेर बस्तवडे येथील एकाने धाडस दाखवून वाले यांचा ‘कार्यक्रम’ केला. त्यांच्या कारभाराचा भांडाफोड केला. संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाले यांची तक्रार केली. एका तक्रारीतील सुनावणीचा निकाल सबंधितांच्या बाजूने लावून नोंद घालण्यासाठी वाले यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेनंतर सबंधितांमध्ये 7 हजारांचा सौदा ठरला. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाले यांच्यावर झडप घातली.

वाले यांना रंगेहाथ पकडल्याने महसूलमधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. वैशाली वाले यांच्याप्रमाणेच तालुक्यातील इतर तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयातही हाच कारभार चालतो. नोंदीसाठी प्रत्येक ठिकाणी रेटकार्ड ठरले आहे. अधिकाऱ्यांच्या घशात पैसे कोंबल्याशिवाय कामाला हात लावला जात नाही. त्यामुळे सामान्य लोकांच्या नरड्यावर पाय देणाऱ्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या बुडावर लाथा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here