कडेगाव : पलूस-कडेगाव मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे. यावरून येथील स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रतिबिंब मतदार यादीतही उमटल्याचे लक्षात येते. स्त्रीभ्रूण हत्या व गर्भलिंग निदान चाचणीवर कठोर निर्बंध लादले गेले आहेत. तरी स्त्री-पुरुष लोकसंख्येतील तफावत पाहता हा प्रकार पूर्णपणे बंद झाला, असा दावा करण्यास कोणी धजावणार नाही. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर नजर टाकल्यावर दिलासादायक चित्र दिसून येते.
एकूण २ लाख ९१ हजार ६४४ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४५ हजार ५७७ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ४६ हजार ०६५ इतकी आहे. इतर मतदार आठ आहेत. एकंदरीत या मतदारसंघात पुरुषांपेक्षा ४८८ महिला मतदार जास्त आहेत. महिला व पुरुष मतदारांमध्ये अधिक तफावत पलूस तालुक्यात आहे. या तालुक्यात ७३ हजार २१३ पुरुष मतदार आहेत तर ७२ हजार ४२७ महिला मतदार आहेत. पलूस तालुक्यात महिला मतदारांपेक्षा ७८६ पुरुष मतदार जास्त आहेत. कडेगाव तालुक्याने मतदारसंघातील ही तफावत सावरली आहे. कडेगाव तालुक्यात ७२ हजार ३५८ पुरुष तर ७३ हजार ६३८ महिला मतदार आहेत. येथे १ हजार २८० महिला मतदार जास्त आहेत. पलूस कडेगाव मतदारसंघात पुरुषांपेक्षा ४८८ महिला मतदार जास्त आहेत.
तरुणाईत महिलांची संख्या कमी
पलूस-कडेगावच्या मतदार यादीत १८ ते २९ वयोगटात महिलांपेक्षा ४ हजार ६९७ पुरुष मतदार जास्त आहेत. ही बाब चिंतेची आहे. ४० ते ४९ या वयोगटातही महिलांपेक्षा २६८ पुरुष मतदार जास्त आहेत. ३० ते ३९ व ५० च्या पुढे वृद्धांपर्यंत मात्र महिला मतदार अधिक आहेत.