विजापूर गुहागर महामार्गालगत असणारी ५७ लाख रुपये खर्चुन बांधलेली गॅस शवदाहिनी बांधकाम झाल्यापासून आजमितीस बंद अवस्थेत आहे. परिणामी जुन्या स्मशानभूमीवर अंत्यविधीचा ताण येतो. एकाच दिवसात तीन-चार व्यक्तींचा मृत्यू होतो. अशावेळी अंत्यविधी करण्याकरिता ताटकळत बसावे लागते. मृत्यूनंतरही जतवासीयांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
नगरपालिका स्थापन होऊन १२ वर्षे पूर्ण झाली तरीही नगरपालिकेची स्वतंत्र इमारत नाही. कालबाह्य झालेली नळ पाणीपुरवठा योजना, निकृष्ट रस्ते, दिवाबत्तीची अपुरी सोय, तुंबलेल्या गटाऱ्या, गंधर्व नदी अतिक्रमणाच्या कचाट्यात, भाजी मंडईची कमतरता, वाहन पार्किंगची अनुउपलब्धता, घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेचा बोजवारा, महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहांची कमतरता या अनेक प्रश्नांनी ग्रासलेले आहे.
शासनाच्या २०१८ साली नावीन्यपूर्ण योजनेतून गॅस शवदाहिनी प्रकल्पास तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रकल्प उभारणी करण्यास तीन वर्षे लागली. गॅस शवदाहिनी कोरोना कालावधीत सुरू करण्यात आली होती. काही दिवसांतच ती बंद पडली. सदरचा पर्यावरणपूरक स्नेही प्रकल्प का बंद अवस्थेत आहे? संबंधित कंत्राटदाराने देखभाल दुरुस्ती का केली नाही? असा सवाल आहे. तसेच शवदाहिनी सुरू झाल्यास लाकडांचा वापर होणार नाही त्यामुळे शेकडो वृक्षांची कत्तल थांबणार आहे. त्यामुळे शवदाहिनी सुरू होण्याची नितांत गरज आहे.
५० हजार लोकसंख्या असणाऱ्या जत नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. नगरपालिकेचे खुल्या भूखंडावर विकासाचा अभाव, परिणामी ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. मनोरंजनाकरिता विरूंगळा केंद्र, सुसज्ज बगीचा, क्रीडांगणे, पालिकेचे वाचनालये, पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृहे, सार्वजनिक शौचालये या भौतिक सुविधा तर व्यवस्थित मिळत नाहीत. त्यातच मृत्यूनंतरही जतवासीयांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. कार्यालयाकडून लक्ष देण्याची गरज आहे