तासगाव – कवठेमहांकाळमध्ये मोगलाई लागली नाही | रोहित पाटलांनी संजय पाटलांना सुनावले : वैफल्यग्रस्त लोकांनी श्रेयवादासाठी गोंधळ घातला

0
17
तासगाव : तासगाव येथील बाह्यवळण रस्ता मंजूर केल्याबाबत नितीन गडकरी यांनी जो निरोप दिला तो खासदार विशाल पाटील यांनी तासगाव येथील कार्यक्रमात सांगितला. मात्र श्रेयवादासाठी हापापलेल्या मंडळींनी या कार्यक्रमात गोंधळ घातला. खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील बसलेल्या व्यासपीठाकडे धावून जात शिवीगाळ केली. मात्र तासगाव – कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ, असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांना दिला. शिवाय वैफल्यग्रस्त लोक श्रेयवादासाठी हापापले आहेत, अशी सणसणीत टीकाही रोहित पाटील यांनी संजय पाटील यांच्यावर केली.
तासगाव नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आजी-माजी खासदारांमध्ये झालेल्या राड्यानंतर रोहित पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी या कार्यक्रमास उपस्थित नव्हतो. मात्र प्रोटोकॉलमध्ये ज्या गोष्टी बसत नव्हत्या त्या तिथे झाल्या. रिंगरोडबाबत नितीन गडकरी यांनी दिलेला निरोप खासदार विशाल पाटील यांनी तासगावच्या कार्यक्रमात सांगितला. मात्र श्रेयवादासाठी हापापलेल्या मंडळींनी या कार्यक्रमात गोंधळ घातला.
खासदार विशाल पाटील यांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न झाला. आमदार सुमन पाटील, खासदार विशाल पाटील व्यासपीठावर होते त्या व्यासपीठाकडे धावून जात शिवीगाळ करण्यात आली. हा काय प्रकार आहे त्यांनीही समजून घ्यायला हवे. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ.
ते म्हणाले, तासगावच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारे कोणत्या दशेतून चालले आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही. वैफल्यग्रस्त लोक असे वागतात, असे मला काही जुन्या – जाणत्या लोकांनी सांगितले आहे, अशीही टीका रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर केली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here