तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी काहींनी इथे येऊन नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आम्ही यापुढे जशास तसे वागण्याची भूमिका घेतली आहे. मला पुन्हा ‘त्या’ रस्त्यावर यायला लागू नका, असा खणखणीत इशारा माजी खासदार संजय पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील यांना दिला.तासगाव नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील, माजी खासदार संजय पाटील उपस्थित होते. भाषणादरम्यान खासदार विशाल पाटील यांनी बाह्यवळण रस्त्याच्या निधीचा विषय काढून माजी खासदार संजय पाटील यांना डिवचले. नितीन गडकरी यांनी विरोधी गटातील आमदारांची मागणीही मान्य केल्या याचा आनंद असल्याचे सांगितले.यावरून संजय पाटील चांगलेच भडकले. त्यांनीही विशाल पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. इथं मानाने बोलावलं आहे.
मान घ्यायचं बघा. नको ती नौटंकी करू नका, अशा शब्दात त्यांना सुनावले. यावरून दोघांमध्ये जोरदार खडा जंगी झाली. कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या अंगावर धावून गेले.दरम्यान याबाबतीत बोलताना संजय पाटील म्हणाले, राजकारणात चमकोगिरी करणारी काही माणसे आहेत. अलीकडील काळात त्यांच्याकडून अनेक बेताल वक्तव्य होऊ लागली आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले आहे.
तरीही काही लोकांनी आज तासगाव नगरपालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात येऊन नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. माझं भाषण सुरू असताना त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आता यापुढील काळात जशास तसे वागण्याची भूमिका घेतली आहे. मला पुन्हा ‘त्या’ रस्त्यावर आणू नका, असा गर्भित इशारा यावेळी संजय पाटील यांनी विशाल पाटील व रोहित पाटील यांना दिला.