जत : जत विधानसभा मतदारसंघातील रामपूर येथे आज ४ कोटी ६९ लाख निधीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यामध्ये रामपूर येथील ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर वास्तव केले होते असे ऐतिहासिक दाखले आहेत.मात्र किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. शासनाच्या प्रयत्नांनंतर हा निधी उपलब्ध झाला असून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
या विकास कामांमध्ये किल्ल्याचे संपूर्ण नूतनीकरण, पायवाट तयार करणे, विद्युत सुविधा पुरवणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधणे, तसेच लहान मुलांसाठी खेळाच्या वस्तू उभारणे या बाबींचा समावेश आहे. या कामांमुळे जत तालुक्याची ऐतिहासिक ओळख टिकून राहण्यास मदत होईल आणि येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणाचा लाभ घेता येईल. आपल्या इतिहासाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, आणि हे विकास काम त्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.यासोबतच मौजे रामपूर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील पार पडले.
समाज मंदिर चौक ते चावडीपर्यंत रस्त्याच्या बाजूचे काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे(२० लाख),नागरी सुविधा योजनेतून रामपूर गावात हाऊसबाई आठवले घर ते पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण(९ लाख)अशा प्रकारे या कामांमुळे रामपूर गावाचे चेहरामोहरा बदलणार असून, स्थानिक रहिवाश्यांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील,असे आमदार सावंत म्हणाले.