कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या विशेष सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत. लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते आणि ते सोडवण्यासाठीसुद्धा पुढाकार घेते हे पाटील परिवाराने आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे.
मुलांना वाचायला शिकवण्याचा प्रवास जन्मापासूनच सुरू होतो. ‘वाचन’ आणि ‘श्रवण’ हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु ते ऐकू शकतात. किंबहुना त्यांची या काळातली ‘श्रवणशक्ती’ व ‘ग्रहणशक्ती’ अतिशय तल्लख असते. अगदी लहानपणापासून मुलांना वाचून दाखवल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात मौलिक भर पडते. मुलांना वाचनाची गोडी लागते. त्यांच्या शब्दसामर्थ्यात विलक्षण वाढ होते. त्यांच्यातील आकलनक्षमता आणि सर्जनशीलता विकसित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनकौशल्याचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुलांचे वाचनकौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्यामागचे शास्त्रीय संशोधन याविषयी पालकांना, शिक्षकांना सहजसोप्या शब्दात ओळख व्हावी म्हणून पाटील दाम्पत्य आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य करत आहेत. या प्रक्रियेतील पालकांच्या विशेषतः वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व हे सातत्याने पटवून देत आहेत; वाचन ही एक सकारात्मक सवय मानली जाते ज्याचा सराव दिवसातून किमान एकदा तरी केला पाहिजे.
कारण प्रत्येक मुल स्वतःच्या गतीने वाचायला शिकते, तुम्हाला मुलांमध्ये वाचनाच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी नवनवीन पध्दती आणणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक मराठी पालकाने, शिक्षकाने वाचलेच पाहिजे असे त्यांचे मत आहे.
ग्रामीण भागातील खाजगी शाळा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या सुमारे पंचवीसपेक्षा अधिक शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथ देणगी स्वरुपात देऊन त्या – त्या शाळांच्या माध्यमातून लहान – लहान ग्रंथालयांची निर्मिती त्यांनी केली आहे. प्रत्येक शनिवारी मुले या ग्रंथालयातील आपल्या आवडीची पुस्तके घरी घेऊन जातात. एकदा निवडलेले पुस्तक सदर विद्यार्थ्याकडे आठ दिवस राहते. या आठवड्याच्या कालावधीत सदर विद्यार्थ्याचे आई – वडील, आजी – आजोबा, बहीण – भाऊ आणि मित्र – मैत्रिणी याचा विना शुल्क लाभ घेत आहेत. आज मितीला त्यांच्या या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी वाचनाकडे वळले असून; नियमित पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थी मोबाईल आणि टेलीव्हिजनपासून दूर जात आहेत हा एक खूपच चांगला आणि दृश्य स्वरुपातील बदल पहावयास मिळत आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागल्यामुळे नियमित अभ्यास करणे आणि नियमितपणे शाळेला येण्याचे मुलांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.
दोन तास टी. व्ही. आणि मोबाईल बंद हा उपक्रम गावोगावी राबवल्यास विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय राहील. मुलं तर अभ्यास करतीलच. पण पालकांच्यातही सुसंवाद वाढेल आणि ती खरी काळाची गरज आहे. पुस्तकासारखा निष्ठावान दुसरा कोणी मित्र नाही कारण एक उत्तम पुस्तक आपल्याला बर्याच अनुभवांशी जोडतो. त्यातून वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता.
डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील तसेच या शिक्षक दांपत्याचा मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील या संपूर्ण परिवाराचे ग्रंथप्रेम सर्वश्रुत आहे. शिवाय त्यांच्या परिवारातील सर्वजण उत्तम वाचक आहेत. पन्नास हजारापेक्षा अधिक विविध विषयांवरील आणि विविध भाषेतील पुस्तकांचा त्यांचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह आहे. आपल्या स्व: मालकीच्या ग्रंथसंग्रहातील आणि समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनी त्यांना देणगी स्वरुपात दिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून ते शाळा – शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथदान करत आहेत. मुलांच्या या वाचनासाठी समृद्ध आणि पोषक वातावरण तयार करता आले पाहिजे. मुलांच्या या वाचनासाठी त्यांचा त्याला अवकाश देता आला पाहिजे. मुलांनी वाचते व्हावे, असे वाटत असेल तर शिक्षक आणि पालकांनी त्यांच्यासमोर आवर्जून वाचायला घेण्याची नितांत गरज आहे.
डॉ. सुनील दादा पाटील हे एक उत्तम लेखक आणि संपादक असून खंगत चाललेला आणि अभावग्रस्त जगणारा गावगाड्यातील अखेरचा माणूस त्यांच्या साहित्याचा विषय राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याने गाव गाड्यातला सूक्ष्म भवताल त्यांच्या बालमनावर उमटलेला दिसतो. सर्वसाधारण खेड्यातल्या पोरांसारखेच त्यांचेही कुरतडून टाकणारं बालपण त्यांच्या कवितेतून वेळोवेळी प्रवर्तित झालेलं दिसतं. असंख्य खेड्यातून आलेल्या नवोदित लेखकांच्या हाताला लिहितं करणारा, बळ देणारा एक तरुण आणि कल्पक प्रकाशक म्हणूनसुद्धा ते साहित्य क्षेत्रात परिचित आहेत. हल्ली काही प्रस्थापित साहित्यिक आपल्याच कोशात जगताना दिसून येतात. मात्र अशा काळात त्यांना भेटलेली, भावलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे कवितेच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी आणली आहेत. डॉ. सुनील दादा पाटील यांनी आपल्या अनोख्या वाचन आणि साहित्य चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर साहित्य गणगोत जोडण्याचे काम केले आहे. शंभरापेक्षा जास्त दर्जेदार पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. अनेक सभा आणि संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. असे असतानाही साहित्यावरची आपली निष्ठा तसूवरही कमी होऊ दिली नाही तर अनेकांना प्रेरणा दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, साहित्यिक व वैचारिक क्षेत्रात पाटील परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्ञानाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्यासाठी ते स्वत: अहोरात्र प्रयत्न करत आहेत हे विशेष. वाचनामुळे बालपणी ज्ञान मिळते, तरूणपणी व्यक्तिमत्त्व घडते, म्हातारपणी दु:ख नाहीसे होते. असे वाचन सर्वांनाच हितावह असते.
गावचा अंधार दूर करायला प्रत्येक बालकाच्या हातात पाटी आणि पुस्तकं यायला हवी असं ते फक्त सांगून थांबले नाहीत तर आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक लेखक घडवले. आपली वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी सातत्याने ते विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असतात. आपल्या देशातील विविध प्रादेशिक भाषांमधून त्यांनी साहित्य निर्मिती केली. २०१० पासून आजतागायत ‘कवितासागर सेवाभावी संस्थेच्या’ माध्यमातून ते आपल्या पत्नीच्या मदतीने विविध शाळांच्या माध्यमातून ‘मुलांचे मोफत ग्रंथालय’ चालवत आहेत. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचे सर्वत्र सांगितले जात असले, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती येथील पाटील दांपत्याने या समजाला छेद दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ मोबाईल अथवा टीव्ही पाहण्यात वाया घालवू नये. त्याऐवजी त्यांनी उत्तमोत्तम पुस्तके वाचावीत म्हणून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या जोडीला अवांतर वाचनाची मोफत संधी देण्यासाठी पाटील दांपत्य अत्यंत प्रयत्नशील आहेत.
आधुनिक जीवन पद्धतीत सात्विक जीवनासाठी वाचनाचे महत्त्व खूप मोठे आहे. वाचनाच्या छंदाचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असून, या पुढील काळात वाचनाचे महत्त्व सर्वांना समजून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी त्यांनी प्रत्येक शनिवार हा वाचन चळवळ आणि शालेय मुलांच्यावर सुसंस्कार व्हावेत यासाठी राखून ठेवला आहे; अशा पद्धतीने वर्षभरातील बावन्न दिवस डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील विनावेतन आपली नि:स्वार्थ सेवा विविध शाळांना देत आहेत. तुम्हीही भेट देताना ज्या वयाची मुलं आहेत त्यानुसार पुस्तकं भेट म्हणून द्या. तुमची मुलं वाचन करावी यासाठी त्यांच्या सोबत तुम्हीही वाचा असे आवाहन ते पालकांना करत आहेत.
धरणगुत्ती वाचन चळवळ ही एक महत्त्वाची चळवळ आहे जी वाचनाची आवड वाढवण्यासाठी आणि समाजात वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. या चळवळीचे उद्दिष्ट लोकांना वाचनाची गोडी लावणे आणि विविध प्रकारच्या साहित्याचा आनंद घेण्यास प्रवृत्त करणे आहे. विद्यार्थ्यांच्यामध्ये बालपणीच साहित्याची गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या कल्पकतेला संधी मिळावी या हेतूने त्यांनी अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले त्यामधून त्यांनी असंख्य ‘विद्यार्थी साहित्यिक‘ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी प्रथितयश व मोठे साहित्यिक या गावातील शाळेमध्ये आणून त्यांच्या साहित्याची प्रसादरुपी मेजवानी सबंध घटकांना दिली. हे ‘बाल साहित्यासाठी‘ केलेलं काम समाधानकारक व साहित्यिकवृद्धी करण्यामध्ये मोलाचे ठरले. वाचन संस्कृती व चळवळ जतन व वृद्धिंगत व्हावी यासाठी त्यांनी शाळा – शाळांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक ‘कवी व वाचन कट्टा‘ निर्माण केला. या कट्ट्याच्या माध्यमातून नवोदित कवी व लेखक निर्माण करणे हा हेतू होता त्यास अंशतः यशही मिळाले. मुलांनी जास्ती जास्त तास वाचन व अभ्यास करावा यासाठी अनेक वाचन स्पर्धांचे आयोजन केले त्यातून त्यांची वाचन चळवळीविषयींची तळमळ लक्षात येते हे एक प्रामाणिक व सच्चा व हाडाच्या शिक्षकाचे लक्षण दिसते. त्यांनी आजपर्यंत शेकडो पुस्तकांचे संपादन आणि लेखन करून समाजात वैचारिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आजतागायत अनेक ग्रामीण व विद्रोही साहित्य संमेलनात उद्घाटक व व्याख्याता म्हणून कार्य केले. त्यांनी अनेक नियतकालिकांचे संपादन केले असून; यामधून त्यांची साहित्याविषयीची भक्ती व साहित्य चळवळ पुढे नेण्याचा मानस दिसतो. त्यांचं साहित्यविषयक योगदान पाहता अनेक संघटनेने साहित्य विषयक कार्याबद्दल अनेक मानाचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
प्रत्येक शनिवारी (काही कारणास्तव शनिवारी शाळांना सुट्टी असल्यास सोमवार किंवा त्यापुढील दिवस) ते विविध शाळांना भेटी देऊन तेथील मुलांना कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, सुविचार संग्रह, व्याकरण, भाषणांचा संग्रह, अनुवादीत साहित्य, विविध विषयावरील नियतकालिके, दिवाळी अंक आणि आरोग्य विषयक इत्यादि पुस्तकांचे वाटप करणे, वाचलेली पुस्तके परत घेऊन नवीन पुस्तके अदा करणे, पुस्तके वाचून मुलांनी लिहीलेल्या प्रतिक्रियांवर मुलांसोबत चर्चा करणे, निवडक प्रतिक्रिया पोस्टकार्डवर लिहून संबंधित लेखक / कवी यांना पाठविणे. तसेच मुलांना संस्काराच्या आणि सुविचारांच्या गोष्टी सांगून एक संस्कारक्षम आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम पिढी घडवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना वाचनाची आणि लिहिण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
~ कवितासागर फिचर्स, जयसिंगपूर
पोस्ट बॉक्स ६९, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर – 416101, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र, 9975873569, 8484986064, 02322 225500, sunildadapatil@gmail.com
—